सहा महिन्याआधीच महापौरपदासाठी शिवसेनेत मोर्चे बांधणी

Aurangabad Mahapalika
Aurangabad Mahapalika

औरंगाबाद: सहा महिन्यानंतर होणाऱ्या महापौरपदाच्या निवडीसाठी शिवसेनेत आतापासूनच मोर्चे बांधणीला सुरुवात झाली आहे. भाजपच्या महापौरांचा एक वर्षाचा कालावधी येत्या ऑक्‍टोबरमध्ये दहा महिन्यातच संपणार आहे. निवडणुकपुर्व युतीच्या लेखी करारनाम्या नुसार शेवटची अडीच वर्ष महापौरपद शिवसेनेकडे राहणार आहे. त्यामुळे ओबेसीसाठी राखीव असलेल्या या पदावर आपली वर्णी लागावी म्हणून शिवसेनेतील बारा नगरसेवकांनी मोर्चे बांधणी सुरु केली आहे.

नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद व प्रभाग समिती निवडणुकीत शिवसेनेने भाजपला दगा दिल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये आहे. या पार्श्‍वभूमीवर महापौरपदाच्या निवडणूकीत शिवसेनेला दणका देण्याची तयारी भाजपने चालवली आहे.

महापालिका निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीमध्ये झालेल्या करारानूसार पहिले दीड व शेवटची अडीच वर्ष महापौरपद शिवसेनेकडे तर मधले एक वर्ष भाजपला देण्याचे ठरवण्यात आले होते. राष्ट्रीय व राज्य पातळीवर शिवसेना-भाजपचे संबंध कितीही ताणले गेले तर त्याचा परिणाम महापालिकेतील युतीवर होऊ द्यायचा नाही याला दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी तोंडी समंती दिलेली आहे. त्यानूसार दोन महिने उशीरा का होईना शिवसेनेच्या महापौरपदाचा राजीनामा देऊन भाजपच्या भगवान घडामोडे यांच्याकडे महापौरपदाची सुत्रे दिली होती. चार महिन्यात रस्त्यांसाठी 150 कोटींच्या निधीची मंजुरी असो किंवा भाजप आमदार अतुल सावे यांनी 24 कोटींचा निधी आणल्याचा दावा असो यातून युतीमध्ये तणाव पहायला मिळाला. जिल्हा परिषद व राज्यातील महापालिका निवडणुकीत शिवसेनेने भाजपशी युती तोडल्यावर परिस्थीती अधिकच चिघळली. जालना व औरंगाबाद जिल्हा परिषदेत कॉंग्रेस, राष्ट्रवादीला सोबत घेऊन शिवसेनेने सत्ता हस्तगत केल्यामुळे तर पित्त खवळलेली भाजप शिवसेनेला अद्दल घडवण्यासाठी संधीच्या शोधात आहे. शिवसेनेने देखील भाजपकडून दगाफटका होण्याची शक्‍यता गृहित धरून सावध पावले टाकण्याचे धोरण स्वीकारल्याचे दिसते.

महापौरपदासाठी स्थायीवर पाणी

स्थायी समितीमधील 8 नगरसेवक येत्या 30 एप्रिल रोजी निवृत्त होत आहेत. यात विद्यमान सभापती मोहन मेघावाले यांच्यासह शिवसेनेच्या पाच, एमआयएमच्या दोन तर भाजपच्या एका सदस्याचा समावेश आहे. त्यामुळे त्यांच्या जागी नव्याने एवढ्याच नगरसेवकांची नियुक्ती केली जाणार आहे. परंतु ऑक्‍टोबरमध्ये होणाऱ्या महापौरपदाच्या निवडणुकीत दावा सांगता यावा यासाठी शिवसेनेच्या नगरसेवकांनी स्थायी समितीच्या सदस्य पदावर पाणी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. ओबीसी संवर्गातील 12 नगरसेवक शिवसेनेकडे असल्यामुळे प्रत्येकालाच महापौरपदाची खुर्ची खुणावत असल्याचा भास होतांना दिसतो आहे. त्यामुळे स्थायी समिती सदस्य म्हणून पक्षाकडून आपले नाव पुढे केले जाऊ नये यासाठी अनेक नगरसेवकांनी देव पाण्यात ठेवले आहेत.

खैरे-दानवे पुन्हा आमने-सामने

जिल्हा परिषद अध्यक्षपदावर जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी ऍड. देवयानी डोणगांवकर यांचे नाव मातोश्रीवर पुढे करत त्याला मंजुुरी मिळवली. त्यामुळे महापौरपदाच्या वेळी दानवे यांनी महापालिकेत लूडबूड करु नये याची काळजी खासदार खैरेंकडून घेतली जाण्याची शक्‍यता आहे. ओबेसी संवर्गातील 12 नगरसेवक शिवसेनेकडे असले तरी यातील मोहन मेघावाले, नंदकुमार घोडेले, सुमित्रा हाळनोर व विकास जैन ही चार नावेच जुनी आणि अनुभवी आहेत. सुमित्रा हाळनोर या पहिल्यांदाच निवडूण आलेल्या असल्या तरी त्यांचे पती गिरजाराम हाळनोर हे अनुभवी नगरसेवक आहेत. त्यामुले महापौरपदावर जुन्या अनुभवी नगरसेवकांना संधी द्यायची का नव्यांना पुढे आणायचे यावर शिवसेनेत खल होऊ शकतो. 12 पैकी ज्या पाच नगरसेवकांची स्थायीमध्ये नियुक्ती केली जाईल त्यांचा पत्ता महापौरपदाच्या शर्यतीतून कट होईल. त्यामुळे उरलेल्या पाच नगरसेवकांतून "कौन बनेगा महापौर' हे पाहणे औत्सुक्‍याचे ठरणार आहे.

 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com