Shiv sena MLA Fad resigned for contratership problems | Sarkarnama

गुत्तेदारीच्या व्यवहारिक अडचणीतून आमदार फड यांनी शिवसेना सोडली

सरकानामा वृत्तसेवा
गुरुवार, 23 मार्च 2017

मानवत पंचायत समितीच्या सभापतिपदासाठी पक्षाचा व्हिप नव्हताच, असा खुलासा खासदार संजय जाधव यांनी यावेळी केला. पक्षाचे सचिव सुभाष देसाई यांच्याशी आपण स्वता बोललो आहोत. त्यांनी आपण कुठलाही व्हीप काढला नसल्याचे सांगितले आहे.

परभणी: पाथरीचे आमदार मोहन फड यांनी गुत्तेदारीच्या व्यवहारिक अडचणीतून शिवसेना सोडली आहे. मानवत पंचायत समितीच्या सभापतीची निवडणुक हे केवळ कारण असल्याचे स्पष्टीकरण खासदार संजय जाधव यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिले. निष्ठावंत कार्यकर्त्यांची शिफारस करणे चुकीचे असेल तर मी ही चुक केली असल्याचेही खासदार संजय जाधव यांनी सांगितले.

मानवत पंचायत समितीच्या सभापतिपदावरून नाराज झालेल्या आमदार मोहन फड यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी दिल्यानंतर बुधवारी खासदार संजय जाधव यांनी पत्रकार परिषद घेऊन आमदार मोहन फड यांनी केलेल्या आरोपांचे खंडण केले. खासदार संजय जाधव म्हणाले, पंचायत समितीच्या निवडीच्या दिवशी मी दिल्लीत होतो. आमदारांनी ज्या कारणासाठी शिवसेना सोडली त्याची वास्तविकता वेगळी आहे. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत तिकीटासाठी कुठलाही वाद नव्हता. परंतू मानवत पंचायत समितीच्या निवडणुकीतनंतर सभापतीच्या निवडीसाठी सर्वजण  माझ्याकडे आले होते. मी त्यांना दोघांनाही सव्वा -सव्वा वर्ष सभापती करा असे सुचविले होते. 

दत्ता जाधव यांच्यासाठी आमदार मोहन फड यांनी शिवसेना सोडली त्याच दत्ता जाधव यांना तिकीट देण्यासाठी आमदार स्वता: तयार नव्हते. परंतू इंद्रायणी माळावरील जमीनीच्या प्रकरणात माघार घ्यावी. त्या बदल्यात सभापतिपद घ्यावे. असा ठराव दत्ता जाधव व आमदार मोहन फड यांच्यात झाला होता. परंतू बंडू मुळे हे शिवसेनेचे गेल्या २० वर्षापासूनचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. त्यांनाही न्याय मिळणे गरजेचे होते. परंतू मी या प्रकरणी मानवत तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी निर्णय घ्यावा, असे सांगितले होते. त्यानुसार शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी बंडू मुळे यांचे नाव समोर केले. 

आमदार मोहन फड यांनी शिवसेना सोडण्याच्या मागे कारणे वेगळी आहेत. त्यांची मुंबई व ठाणे जिल्ह्यात त्यांची मोठ - मोठी कामे सुरु आहेत. त्या कामासाठी त्यांना गेल्या अर्थ संकल्पात २५ कोटी रुपयांचा निधी दिला होता. परंतू त्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर त्यांचा भाजप सरकारने निधी थांबून धरला. हा मोठा त्रास आमदार मोहन फड यांना होत होता हे या मागचे खरे कारण असल्याचे ही खासदार संजय जाधव यांनी सांगितले. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत आमदार मोहन फड यांच्या इंद्राणी मित्र मंडळाने शिवसेनेच्या उमेदवारांना पराभूत करण्यासाठी उघडपणे काम केले, असा आरोपही त्यांनी यावेळी केला. यावेळी जिल्हा प्रमुख डॉ. संजय कच्छवे यांच्यासह पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

पक्षाचा व्हिप नव्हताच...!
मानवत पंचायत समितीच्या सभापतिपदासाठी पक्षाचा व्हिप नव्हताच, असा खुलासा खासदार संजय जाधव यांनी यावेळी केला. पक्षाचे सचिव सुभाष देसाई यांच्याशी आपण स्वता बोललो आहोत. त्यांनी आपण कुठलाही व्हीप काढला नसल्याचे सांगितले आहे. त्यामुळे पंचायत समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सभापती निवडीत कसलेही गैरकृत्य केलेले नाही अशी पुष्टीही त्यांनी जोडली.

संबंधित लेख