Shiv sena leader Aditya Thakray greeted by minister on his birthday | Sarkarnama

युवानेते आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाला झाडून साऱ्या मंत्र्यांनी लावली हजेरी

मृणालिनी नानिवडेकर
बुधवार, 13 जून 2018

 शिवसेनेतील नवे सत्तामुख्य केंद्र युवानेते आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाला आज झाडून साऱ्या मंत्र्यांनी आणि सेनेच्या नेत्या-उपनेत्यांनी हजेरी लावली.

मुंबई :  शिवसेनेतील नवे सत्तामुख्य केंद्र युवानेते आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाला आज झाडून साऱ्या मंत्र्यांनी आणि सेनेच्या नेत्या-उपनेत्यांनी हजेरी लावली.

आदित्य ठाकरे यांनी गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेतील कारभारावर लक्ष देणे सुरू केले असल्याने त्यांच्या या वाढदिवसाला उपस्थित होण्यासाठी शिवसैनिकामध्ये आज अहमहिका लागली होती. 

आदित्य ठाकरे मातोश्रीवर सकाळी 11 पासून उपस्थित राहतील असे कळविण्यात आले होते. त्यामुळे सेनेच्या केवळ मुंबईतील नव्हे तर राज्यातील अन्य पदाधिकाऱ्यांनीही ही वेळ साधत आज मातोश्रीवर हजेरी लावली. दुपारी 5 वाजेपर्यंत सुमारे पाच ते सहा हजार शिवसैनिकांनी आदित्य ठाकरे यांची प्रत्यक्ष भेट घेतल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले. 

शिवसेनेचे विधानसभेतील नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री दिवाकर रावते, पर्यावरण मंत्री रामदास कदम, गृहराज्यमंत्री दीपक केसरकर, राज्यमंत्री बाबा भुसे यांच्यासह सर्व महत्त्वाच्या व्यक्तींनी आदित्य यांना पुष्पगुच्छ देऊन स्वतःचे छायाचित्र त्यांच्यासमवेत आवर्जून काढले. तसेच ते सोशल मिडियावरही टाकले. शिवसेनेतील नव्या पिढीने युवा नेत्यानीही या दिवसाचे औचित्य साधून आपल्या नेत्याची भेट घेतली.

शिवसेनेच्या प्रवक्‍त्या निलम गोऱ्हे, आदेश बांदेकर, उद्धव ठाकरे यांचे सचिव मिलिंद नार्वेकर आल्या गेलेल्यांची संवाद साधत होते. 19 तारखेला होणाऱ्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात आदित्य ठाकरे यांचेही भाषण होण्याची शक्‍यता वर्तविण्यात येते आहे. सामनाचे संपादक संजय राऊत आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई आदित्य यांना भेटायला आले. 

भारतीय जनता पक्ष तसेच अन्य पक्षातील नेत्यांनीही आदित्य यांना पुष्पगुच्छ पाठविला होता. ठाकरे यांनी स्वभावानुसार मोजकेच बोलत अभिवादनाचा स्वीकार केला. सेनेच्या पुढील वाटचालीत आपण सर्वांनीच साथ द्यावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

संबंधित लेख