Shiv Sena appoints 32 deputy city in charge persons ; party workers confused about chain of command | Sarkarnama

नवी मुंबईत शिवसेनेचे तब्बल 32 उपशहर प्रमुख कार्यकर्त्यांनी नेमके ऐकायचे कोणाचे ?

सुजित गायकवाड
सोमवार, 30 जुलै 2018

शिवसेनेत कोणत्याही प्रकारची संभ्रमावस्था नाही. पक्षाकडून आदेश येतो तोच अंतिम मानला जातो. प्रत्येकाच्या कार्यक्षमतेनुसार संघटनेने पदे दिली आहेत. मागील अडीच वर्षांपासून कार्यकारणी नव्हती. त्यामुळे सर्वांना एकत्र करण्याचा प्रयत्न आहे.
- द्वारकानाथ भोईर, जिल्हाप्रमुख, दक्षिण नवी मुंबई

- पदे वाटप : 106
- जिल्हाप्रमुख : 2
- उपजिल्हाप्रमुख : 11
- शहरप्रमुख : 2
- उपशहरप्रमुख : 32
- विभागप्रमुख : 57

 

नवी मुंबई  : महापालिकेची आगामी निवडणूक नजरेसमारे ठेऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नवी मुंबईत पदांची अक्षरशः खैरात केली आहे.

विशेष म्हणजे यामध्ये नवख्या कार्यकर्त्यांना महत्त्वाची पदे मिळाली आहेत; तर अनेक दिग्गज नेत्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे किंवा त्यांना कमी जबाबदारीची पदे दिली आहेत. या पदवाटप प्रकरणामुळे पक्षांतर्गंत नाराजी उफाळण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे.

नवी मुंबईसाठी आतापर्यंत एकच जिल्हाप्रमुख पद होते. दोन दिवसांपूर्वीच मातोश्रीवरून दोन जिल्हाप्रमुख जाहीर केले आहेत. ऐरोली मतदारसंघाचा दक्षिण नवी मुंबई असा भाग करून जिल्हाप्रमुख पदावर द्वारकानाथ भोईर यांची; तर बेलापूर मतदारसंघाचा उत्तर नवी मुंबई असा दुसरा भाग करून त्यावर विठ्ठल मोरे यांची जिल्हाप्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे.

 त्याखालोखाल बेलापूर मतदारसंघात 8; तर ऐरोली मतदारसंघात तीनच असे तब्बल 11 उपजिल्हाप्रमुख पदांचे वाटप करून नवीन फळी तयार केली आहे; मात्र या फळीमुळे कोणाचे अधिकार किती व कार्यपद्धती करण्याचा परिसर कोणता हे सांगण्याचा विसर पडल्याची चर्चा आहे.

पूर्वी एक उपशहरप्रमुख असल्याने त्याच्यावरच बैठकीच्या आयोजनाची जबाबदारी असल्यामुळे सर्व त्याचे ऐकत होते; मात्र आता तब्बल 32 उपशहर प्रमुख झाल्यामुळे नेमके कोणाचे ऐकायचे, असा संभ्रम होणार असल्याचे शिवसेना कार्यकर्ते खासगीत सांगतात. तसेच उपजिल्हाप्रमुख 11; तर शहरप्रमुख दोन नियुक्त केले आहेत. त्यामुळे शहरप्रमुख हे पद मोठे की उपजिल्हाप्रमुख हे पद मोठे असा संभ्रम कार्यकर्त्यांमध्ये आहे.

दिग्गजांना धक्का
शिवसेनेच्या नव्या कार्यकारिणीतून माजी जिल्हाप्रमुख विजय चौगुले, शहरप्रमुख सुरेश म्हात्रे, हरीभाऊ म्हात्रे, उपशहरप्रमुख नरेश चाळके अशा जुन्या कार्यकर्त्यांना पदे न देता त्यांना अप्रत्यक्षपणे पक्षाबाहेरचा रस्ता दाखवल्याची चर्चा आहे. तसेच काही उपशहरप्रमुखांना फेरीवाला विभाग, निवडणूक सेल अशा नव्या जबाबदाऱ्या दिल्या आहेत. खुद्द नगरसेवकांचे बोट धरून शिवसेनेत आलेल्या नवख्या कार्यकर्त्यांना थेट उपजिल्हाप्रमुख व शहरप्रमुख पदे दिल्याने जुन्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी उफाळून येण्याची शक्‍यता आहे.

 

 

संबंधित लेख