Shital Jadhav's educational expenses will be taken care by Maratha kranti Morcha | Sarkarnama

आई गमावलेल्या शितल जाधवच्या पंखाना मराठा क्रांती मोर्चाचे बळ

दत्ता देशमुख 
सोमवार, 3 सप्टेंबर 2018

शेतकरी कुटूंबातील शितल जाधव हिचे डॉक्टर होण्याचे स्वप्न होते. त्यासाठी तिने जिवापाड मेहनतही केली. मात्र, दंत वैद्यकीय शाखेचे  प्रवेश शुल्क भरता आले नाही म्हणून तिचे डॉक्टर होण्याचे स्वप्न भंगले होते. 

बीड : आईही गेली आणि पैसे नसल्याने वैद्यकीय प्रवेश यादीत नाव असूनही प्रवेश घेता आला नाही. त्यामुळे डॉक्टर होऊन आपल्या मोलमजूरी करणाऱ्या आई - वडिलांचे  पांग फेडण्याच्या शितल जाधवच्या पंखाला मराठा क्रांती मोर्चाने बळ दिले आहे. तिचे भविष्यातील स्वप्न पुर्ण करण्यासाठी मराठा क्रांती मोर्चा तिच्या पाठीशी असल्याची ग्वाही समन्वयक आबासाहेब पाटील यांनी दिली. 

साळींबा (ता. वडवणी) येथील सरस्वती व अशोक जाधव या दाम्पत्याला शितलसह मच्छिंद्र आणि अतुल अशी तीन अपत्ये आहेत. अडीच एकर जिरायती शेती वाहण्याबरोबरच मजूरी करत त्यांनी मुलांचे शिक्षण केले. अतुल जाधव फोटोग्राफीचा व्यवसाय करतो. तर, मच्छिंद्र हा खासगी दवाखान्यात काम करुन आपल्या परिचर्या (बीएससी नर्सिंग) पदवीच्या शिक्षणाचा खर्च भागवितो. दहावीत चांगले गुण मिळविलेल्या शितल जाधव डॉक्टर होण्याचे स्वप्न उराशी बाळगुन लातूरला शिक्षणासाठी गेली. 

आर्थिक कुवत नसल्याने शिकवण्या लावता आल्या नाहीत तरी तिने मेहनतीने यंदा दंत वैद्यकीय  शाखेत प्रवेश मिळावा एवढे गुण मिळविले. मात्र, ता. १८ ऑगस्ट पर्यंत एक लाख ६७ हजार रुपये भरता न आल्याने तिचे डॉक्टर होण्याचे स्वप्न भंगले होते. त्या कारणाने तिची आई सरस्वती जाधव यांनी आत्महत्या केली. आईही गेली आणि डॉक्टर होण्याचे स्वप्नही भंगले असा अंधार तिच्या भविष्यासमोर होता. 

पण, शितल जाधवच्या वैद्यकीय पदवी प्रवेशासह तिच्या पुर्ण भविष्याची जवाबदारी मराठा क्रांती ठोक मोर्चाची आहे, असे आबासाहेब पाटील यांनी रविवारी या कुटूंबियांची भेट घेऊन जाहीर केले. शितलला मायेने जवळ घेऊन 'शितल बेटा तु आज पासुन मराठा क्रांती ठोक मोर्चाची मुलगी आहेस. तुझे वैद्यकीय शिक्षण झालेच पाहिजे. मराठा क्रांती मोर्चा तुझे पूर्ण भविष्य घडविण्याची जवाबदारी स्विकारीत आहे. यापुढील तुझा पूर्ण खर्च करुन मराठा क्रांती मोर्चा व मी स्वतः तुझ्या पाठीशी पालक म्हणुन खंबीर उभा आहे'. असा धीर शितलला दिला.

 मामला येथील दत्ता लंगे या आत्महत्या करणाऱ्या मुलाच्या घरी जाऊनही आबासाहेब पाटील यांनी भेट देऊन मदत केली. आई गेल्याने आयुष्य आणि वैद्यकीय प्रवेश हुकल्याने भविष्य अंधारात लोटलेल्या शितलच्या पंखाला मराठा क्रांती मोर्चामळे बळ मिळाले आहे. 

संबंधित लेख