shirur-political-counceling | Sarkarnama

लोकसभा निवडणुकीसाठी शिरुरच्या ३०० शिवसैनिकांचे कोकणात पॉलिटिकल कौंसिलिंग

भरत पचंगे
रविवार, 25 फेब्रुवारी 2018

कुठल्याच राजकारणाचे संस्कार नसलेल्या खासदार शिवाजीराव आढळराव यांनी चढत्या मताधिक्याने खासदारकीची हॅट्रीक केली आणि आता पुन्हा २०१९ च्या  निवडणूकीच्याही तयारीला ते लागले आहेत. विरोधातील उमेदवारीसाठी कुणीच चर्चेत सुध्दा येवू नये अशी दक्षता घेणारे खासदार आढळराव यांनी आता आपल्या कट्टर ३०० शिवसैनिकांची फौज `पॉलिटिकल कौसिलींग'साठी थेट कोकणात नेली असून व्यावसायिक कौसिंलर अशोक देशमुखांकडून `ब्रेनवॉश' करुन आणलेल्या याच शिवसैनिकांचे लक्ष्य फक्त लोकसभा-२०१९ राहील याची तजवीजच जणू त्यांनी केल्याचे दिसतेय.

शिक्रापूर : कुठल्याच राजकारणाचे संस्कार नसलेल्या खासदार शिवाजीराव आढळराव यांनी चढत्या मताधिक्याने खासदारकीची हॅट्रीक केली आणि आता पुन्हा २०१९ च्या  निवडणूकीच्याही तयारीला ते लागले आहेत. विरोधातील उमेदवारीसाठी कुणीच चर्चेत सुध्दा येवू नये अशी दक्षता घेणारे खासदार आढळराव यांनी आता आपल्या कट्टर ३०० शिवसैनिकांची फौज `पॉलिटिकल कौसिलींग'साठी थेट कोकणात नेली असून व्यावसायिक कौसिंलर अशोक देशमुखांकडून `ब्रेनवॉश' करुन आणलेल्या याच शिवसैनिकांचे लक्ष्य फक्त लोकसभा-२०१९ राहील याची तजवीजच जणू त्यांनी केल्याचे दिसतेय.

राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांचे जिवलग मित्र, कट्टर समर्थक, पवार साहेबांच्या विचारांचे अनुयायी आणि इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील यशस्वी उद्योजक एवढीच काय ती ओळख सन २००४ पर्यंत असलेले शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव यांनी आपला `लाईफ-ट्रॅक' थेट लोकसभेकडे वळविला आणि तब्बल तीन निवडणूकांमध्ये एकहाती खासदारकी स्वत:कडे ठेवली. 

जे काही करायचे ते अगदी `प्रोफेशनल' असा स्वभाव असलेल्या आढळरावांचे उद्योगविश्व जसे व्यापक तसेच त्यांच्या भैरवनाथ शाळा-महाविद्यालयाचेही नाव तेवढेच मोठे. अर्थात हे सर्व करताना त्यांची राजकीय-ओळख गेले तीन पंचवार्षीक केवळ खासदार एवढीच राहीली असून राजकारणात त्यांना बढती मिळत नसल्याने तेही सध्या अस्वस्थच असल्याची चर्चा आहे. अशा स्थितीत ते पुढील लोकसभा निवडणूक लढवतील का? अशी चर्चा असतानाच ते आता लोकसभा-२०१९ च्या तयारीला लागल्याचे नुकतेच निदर्शनास आले असून त्यांनी शिरुर-लोकसभा मतदार संघातील तब्बल ३०० शिवसैनिक नुकतेच दिव्याआगार येथे निसर्गपर्यटनासाठी घेवून गेले आहेत. 

राजकीय मंडळी निवडणूका दिसू लागल्या की, अशी पर्यटनं घडवतात हे काही नवे नाही. मात्र एका विश्वासार्ह कार्यकर्त्याच्या माहितीनुसार यावेळी त्यांनी तीन दिवसांचे निवासी पर्यटन आयोजित केले असून त्यात आगामी निवडणूकीच्या तयारीच्या दृष्टीने प्रत्येक शिवसैनिकाच्या कौटुंबीक, सामाजिक, गावनिहाय आणि त्याच्या बुथनिहाय तयारीच्या आढाव्याचे नियोजन त्यात आखले असून या संपूर्ण नियोजनातून योग्य तो रिझल्ट निघावा म्हणून त्यांनी चक्क व्यावसायिक कौसिंलर (समुपदेशक) असलेले अशोक देशमुख यांचेकडून हे सर्व ब्रेन-वॉशिंग करवून घेतल्याची खात्रीलायक माहिती एका तालुकाप्रमुखाने नाव न सांगण्याच्या अटीवर दिली. 
 
सलग तीन पंचवार्षीक निवडणूकांमध्ये राष्ट्रवादीला धोबीपछाड दिलेल्या खासदार आढळरावांच्या विरोधात लोकसभेसाठी राष्ट्रवादी अजुनही योग्य उमेदवार शोधतेच आहे तर भाजपाने मात्र बुथनिहाय कामाला सुरवात करीत कामालाही सुरवात केलेली आहे. अर्थात भाजपा-राष्ट्रवादीकडून उमेदवार निश्चित होण्याआधी मतदार संघातील निवडणूकपूर्व सर्व तयारी करण्याची तीन पंचवार्षीक निवडणूकीतील परंपरा आढळरावांनी दिव्या-आगारच्या दौऱयाचे निमित्ताने पुढे चालू ठेवली म्हणायला हरकत नसावी कारण राजकारणातील व्यक्ती कधीच निवृत्त होत नसते हे बहुदा मुळचे उद्योगपती असलेले खासदार आढळराव यांना सलग तीन पंचवार्षिकच्या खासदारकीच्या निमित्ताने एव्हाना समजले असणार हे नक्की.   

खरोखरीच सुखावलो : डॉ.पोकळे
व्याख्याते अशोक देशमुख, खासदार शिवाजीराव आढळराव व आमदार सुरेश गोरे यांचेशी थेट संघटनेतील कार्यकर्ता म्हणून झालेला संवाद आमच्यातील कट्टर शिवसैनिक घडविण्यासाठी चांगला कामाला आला असून अशी निवासी शिबीरे व्हावीत. कारण चांगले राजकारण हा सुध्दा संस्कारांचाच भाग असून तो केवळ गावकीतील राजकारणात अडकून होत नाही हे या तीन दिवसांच्या शिबीरात माझ्याबरोबरच प्रत्येक शिवसैनिकाला समजल्याची प्रतिक्रिया शिरुर पंचायत समिती सदस्या डॉ. सुभाष पोकळे यांनी दिली.  

संबंधित लेख