shirur panchkroshi elections | Sarkarnama

शिरूर पंचक्रोशीत आमदार पाचर्णेंसह चार नेत्यांची प्रतिष्ठा पणाला 

नितीन बारवकर
मंगळवार, 13 मार्च 2018

शिरूर पंचक्रोशीतील शिरूर (ग्रामीण), सरदवाडी, अण्णापूर, तर्डोबाची वाडी आणि कर्डेलवाडी या राजकीय, सामाजिक, आर्थिक व सर्वार्थाने "बड्या' समजल्या जाणाऱ्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकींचा बिगुल वाजला अाहे. आमदार बाबूराव पाचर्णे यांच्यासाठी या गावांत वर्चस्व राखणे आवश्‍यक ठरणार आहे. त्यादृष्टीने या निवडणुकांना महत्त्व आहे. 
 

शिरूर : शिरूर तालुक्यात जून 2018 ला मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा बिगुल वाजला असून, या निवडणुकीसाठीची प्रभागरचना व आरक्षण निश्‍चितीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे.

सात मार्चपासून सुरू झालेल्या कार्यक्रमांतर्गत 12 मार्चला प्रारूप प्रभाग रचना, 15 मार्चला विशेष ग्रामसभांद्‌वारे आरक्षण सोडत, 21 मार्चपर्यंत हरकती व 11 एप्रिल रोजी अंतिम प्रभाग रचना जाहीर करण्यात येणार आहे. सरपंचपदाचे आरक्षण यापूर्वीच जाहीर झाले असून, प्रभागरचनेनंतर संबंधित प्रभागांचे आरक्षण निश्चित केले जाणार आहे.

अण्णापूर व कर्डेलवाडीचे सरपंचपद खुले असून, शिरूर, सरदवाडी चे सरपंचपद नागरिकांच्या इतर मागास प्रवर्गासाठी राखीव झाले आहे. आमदार बाबूराव पाचर्णे यांचे गाव असलेल्या तर्डोबावाडीचे सरपंचपद महिलेसाठी राखीव आहे. 

शिरूर पंचक्रोशी म्हणजे आमदार बाबूराव पाचर्णे यांचे "पॉकेट व्होट' समजली जाते. पंचक्रोशीतील ग्रामपंचायत निवडणुका गेल्या 25 वर्षांपासून त्यांच्याभोवतीच फिरत असल्याचे चित्र आहे. त्यांच्या पाचही विधानसभा निवडणुकीत ही "व्होट बॅंक' भक्कमपणे त्यांच्या पाठीशी उभी राहिल्याचे चित्र आहे.

विधानसभेतील त्यांच्या दोन विजयांतही पंचक्रोशीचा कल निर्णायक ठरला आहे. तरीही त्यांचा मुलगा राहुल यांच्या जिल्हा परिषद निवडणुकीतील पराभवाने त्यांच्या या मजबूत किल्ल्याला हादरे बसले असून, शशिकांत दसगुडे या पंचक्रोशीतील प्रखर मोहऱ्याला "राष्ट्रवादी' ने आपल्या बाजूने घेत थेट शिरूर बाजार समितीचे सभापती केल्याने पाचही ग्रामपंचायतीत पाचर्णेंना झगडावे लागणार असल्याची चिन्हे आहेत.

पुढील विधानसभेची पूर्वतयारी म्हणून माजी आमदार अशोक पवार यांच्याकडून "राष्ट्रवादी' च्या शिलेदारांबरोबरच; पाचर्णे यांच्याकडून दुखावलेल्यांना "रसद' व दारूगोळा मिळू शकतो, अशी स्थिती आहे. 

आमदार पाचर्णे यांच्या तर्डोबावाडीत दोन गट असून, एक गट कायमच "राष्ट्रवादी' शी संधान साधून असतो. पाचर्णे यांच्या एकगठ्ठा ताकदीसमोर त्यांचा टिकाव लागत नाही ही वस्तुस्थिती असली; तरी "उपद्रव' करून स्वतःचे महत्व वाढविण्याला आणि त्यातून स्वहित साधण्यालाच ही मंडळी आजवर महत्व देत आली आहे.

गावातूनच विरोध नको म्हणून आमदारांनाही त्यांना गोंजारण्याची भूमिका घ्यावी लागत असल्याचे आजवरचे चित्र आहे. शिरूर ग्रामीणमध्ये आमदारांचा गट मजबूत असला; तरी शशिकांत दसगुडे यांच्या रूपाने मोठा व मजबूत विरोध उभा राहू शकतो. बाजार समितीचे सभापती हे मोठे पद हाती असलेले दसगुडे शिरूरबरोबरच; कर्डेलवाडी, सरदवाडी येथेही निर्णायक भूमिका बजावू शकतात. 

सभापती न केल्याने नाराज झालेले, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष मानसिंग पाचुंदकर यांना शिरूर, कर्डेलवाडी व अण्णापूर या ग्रामपंचायतीत मानणारा ठराविक वर्ग आहे. त्यामुळे ते कुणाच्या पारड्यात पसंती टाकतात, यावरही या ग्रामपंचायतींचा निकाल ठरू शकतो, अशी स्थिती आहे. काहीशी बिघडलेली स्थिती आमदारांनी सावरल्यास या ग्रामपंचायतींवर पुन्हा त्यांचे वर्चस्व निर्माण होऊ शकतेय मात्र, ऐन निवडणुकीच्या तोंडावर कुणीच न ऐकण्याची भूमिका घेतल्यास "आपल्या' माणसांना निवडून आणण्यास त्यांना झगडावे लागू शकते, अशी स्थिती आहे. 
 

संबंधित लेख