Shirur APMC : Dasgude elected unopposed as Chairman | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

विनोद तावडे कृष्णकुंजवर . राज ठाकरे आणि विनोद तावडे यांच्यात चर्चा .

शिरूर बाजार समितीच्या सभापतिपदी शशिकांत दसगुडे;  उपसभापतिपदी विश्‍वास ढमढेरे बिनविरोध

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 15 जून 2017

बाजार समितीतील दोन्ही पदे शिरूर विधानसभा मतदारसंघाकडे राहिली आहेत. त्यामुळे आमदार अशोक पवार यांचा वरचष्मा या निमित्ताने कायम राहिला आहे. ही बाजार समिती पुन्हा कार्य़रत करण्याची जबाबदारी नव्या पदाधिकाऱ्यांवर आहे.

 
शिरूर : शिरूर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतिपदी शशिकांत पांडुरंग दसगुडे यांची; तर उपसभापतिपदी विश्‍वास रामकृष्ण ढमढेरे यांची आज बिनविरोध झाली.
 
बाजार समिती संचालक मंडळाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसने बहुमत मिळविले होते. त्यामुळे सभापती - उपसभापती "राष्ट्रवादी' चेच होणार हे स्पष्ट होते. तथापि, कोणाला संधी मिळणार याबाबत कमालीची उत्सुकता होती. शिरूर - आंबेगाव या विभागणीमुळे ही पदे विभागून दिली जातील, अशीही अटकळ बांधली जात होती. प्रत्यक्षात दोन्ही पदे शिरूर विधानसभा मतदारसंघालाच मिळाली. या पदांच्या निवडीसाठी "राष्ट्रवादी' च्या स्थानिक नेत्यांच्या व पदाधिकाऱ्यांच्याच दोन - तीन बैठका झाल्या. मात्र, त्यामध्ये अंतिम निर्णय होऊ शकला नाही. 

दरम्यान, आज पुणे जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष रमेश थोरात यांनी पक्षनिरीक्षक म्हणून सर्व संचालकांची मते जाणून घेतली. माजी आमदार ऍड. अशोक पवार व पोपटराव गावडे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत सभापतिपदाची उमेदवारी शशिकांत दसगुडे यांना; तर उपसभापतिपदाची उमेदवारी विश्‍वास ढमढेरे यांना देण्याचे ठरल्यानंतर या दोघांनी उमेदवारी अर्ज दाखल केले.
 
भाजप पॅनेलमधून निवडून आलेल्या विकास शिवले यांनीही उपसभापतिपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. संचालक मंडळाच्या पहिल्याच सभेत, मतदानाचे कामकाज सुरू होण्यापूर्वी शिवले यांनी उमेदवारी मागे घेतली. त्यामुळे सभापतिपदी दसगुडे; तर उपसभापतिपदी ढमढेरे यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी सुनंदा जाधव यांनी जाहीर केले. या निवडीनंतर रमेश थोरात यांच्या हस्ते नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. ऍड. पवार व गावडे यांच्यासह पंचायत समितीच्या उपसभापती मोनिका हरगुडे, माजी उपसभापती राजेंद्र जासूद, खरेदी - विक्री संघाचे अध्यक्ष बाळासाहेब नागवडे, जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र जगदाळे, घोडगंगा साखर कारखान्याचे संचालक बाबासाहेब फराटे व दत्तात्रेय फराटे आदी उपस्थित होते. 

"शिरूर बाजार समितीची स्थावर मालमत्ता मोठी असून, विकासाला मोठा वाव आहे. यापूर्वीच्या कारभारात काही चुका झाल्या असतील; तर त्या दूर करून या बाजार समितीला जिल्ह्यातील एक नंबरची बाजार समिती म्हणून नावलौकिक मिळवून देण्यासाठी सर्वांनीच मनापासून प्रयत्न करावेत'', असे आवाहन रमेश थोरात यांनी यावेळी केले. सभापती - उपसभापती निवडी बिनविरोध करण्यासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व घटकांचे आभार मानताना अशोक पवार यांनी विरोधकांनाही विशेष धन्यवाद दिले.

 
 

संबंधित लेख