shirala assembly political equation | Sarkarnama

महादेवराव, सम्राटसाठी शिवाजीराव नाईकांचे तिकीट कापणार आहात का? 

जयसिंग कुंभार
शनिवार, 15 सप्टेंबर 2018

महादेवरावांनी सांगली जिल्ह्याच्या पश्‍चिम भागातील राजकारणाला उकळी दिली आहे.

सांगली : कोल्हापूरच्या शिवाजी चौकातील महागणपतीच्या व्यासपीठावरून महादेवराव महाडिक यांनी शिराळा विधानसभा मतदारसंघातून सम्राट महाडिक यांच्या उमेदवारीची घोषणा करीत सांगली जिल्ह्याच्या पश्‍चिम भागातील राजकारणाला उकळी दिली आहे.

सारी फौज भाजपमध्ये पाठवून स्वतः मात्र सर्व पक्षांच्या वर राहणारे महादेवराव यांनी सम्राट यांच्या उमेदवारीची घोषणा करीत भाजपचे विद्यमान आमदार शिवाजीराव नाईक, माजी आमदार मानसिंगराव नाईक, आमदार शिवाजीराव देशमुख आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील या शिराळा मतदारसंघातील सर्वच प्रस्थापित नेत्यांना थेट आव्हान दिले आहे.

दही हंडीच्या निमित्ताने गेले तीन वर्षे सम्राट महाडिक शिराळा विधानसभा मतदार संघात जोर बैठका मारत आहेत. या विधानसभा मतदारसंघातून आजवर कॉंग्रेसचे शिवाजीराव देशमुख यांनी राज्यस्तरावर नेतृत्व केले. त्यांचेचे शिष्य असलेल्या शिवाजीराव नाईक यांनी 1994 मध्ये बंडखोरी करीत शंकरराव चरापले यांचा पराभव करीत विधानसभेत प्रवेश केला. त्यानंतर देशमुख मागे पडले आणि शिवाजीराव नाईक आणि मानसिंगराव नाईक यांच्यात गेल्या तीन टर्म भाऊबंदकीचे राजकारण सुरु आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या वाळवा तालुक्‍यातील 48 गावे शिराळा मतदारसंघात येतात. त्यामुळे शिराळा विधानसभा मतदारसंघात जयंतरावांचा पासंग नेहमीच महत्वाचा राहिला आहे.गेल्यावेळी राष्ट्रवादीचे आमदार मानसिंगरावांचा पराभव करताना शिवाजीरावांनी कॉंग्रेसऐवजी भाजप पक्ष निवडला. आता शिवाजीराव भाजपमध्ये आहेत मात्र त्यांना अपेक्षित असलेले मंत्रीपद मिळालेले नाही.

मानसिंगरावांनी कॉंग्रेसचे सत्यजीत देशमुख यांच्यासोबत आघाडी करीत पंचायत समिती, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत निवडणुकीत शिवाजीरावांना ताकदीने विरोध केला आहे. कॉंग्रेस-राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये सध्या सुरु असलेल्या या धुमश्‍चक्रीत आता सम्राट महाडिक यांची भर पडली आहे. त्यामुळे आता ही लढत तिरंगी किंवा चौरंगीही होऊ शकते. कारण आमदार शिवाजीराव देशमुख यांचा वाढदिवस दणक्‍यात साजरा करीत कॉंग्रेसने आघाडीच्या चर्चेत ही जागा मिळाली पाहिजे असा बाण मारला आहे. महाडिकांचे मुळ गाव येलूर. या पंचक्रोशीतल दोन जिल्हा परिषद मतदारसंघावर त्यांनी आपले वर्चस्व नेहमीच सिध्द केले आहे. महादेवरावाचे बंधू नानासाहेब महाडिक यांना सांगली जिल्ह्यातील राजकारणात नेहमीच सर्व पक्षांनी ठराविक अंतरावर ठेवले आहे. नानासाहेब कॉंग्रेसचे नेते असले तरी त्यांनी कधी पक्ष म्हणून जिल्ह्यात कधीच लक्ष घातलेले नाही.

वाळव्याच्या राजकारणातही त्यांची पुर्ण विरोधक अशी स्वतंत्र स्पेस कधीच तयार झाली नाही. कधी जयंतरावांना विरोध, समझोता तर कधी अंतर्गत समझोता असा त्यांचा राजकीय प्रवास राहिला आहे. वाळव्याच्या राजकारणात जयंतरावांना असलेल्या अनेक विरोधकातील एक विरोधक अशी त्यांची जागा आहे. त्यांनी आता मुलगा सम्राटसाठी शिराळ्याकडे मोर्चा वळवल्याने जयंतरावांना थोडी उसंत मिळण्याचीही शक्‍यता आहे. वाळव्यातील 48 गावांवरच महाडिकांची मुख्य भिस्त असेल. त्यामुळेच राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी वाळवा मतदारसंघात निशिकांत पाटलांसह रान उठवले असताना नानासाहेबांनी विरोधी आघाडीपासून थोडी फारकत घेतली आहे.

काही दिवसापुर्वीच शिराळ्यातून विधानसभेसाठी सम्राट महाडीक यांच्या उमेदवारीची घोषणा नारायण राणे यांचे चिरंजीव नितेश राणे यांनी केली होती. भाजपने तिकीट दिले तर ठीक नाहीतर सम्राट स्वाभिमानीतून लढतील असेही त्यांनी जाहीर केले आहे. सम्राट स्वाभिमानीचे पहिले आमदार असतील असे जाहीर करून त्यांनी शड्डू ठोकले आहेत. दुसरीकडे लोकसभा मतदारसंघाचीही नवी राजकीय समिकरणे अस्तित्वात येत आहेत. खासदार राजू शेट्टी व जयंत पाटील यांच्यातील वाढती जवळीकीला नवे संदर्भ आहेत. राजकारणाचा बदलता पट पाहता शिराळ्याचे मैदान यावेळचे मैदान बहुरंगी असेल. 

संबंधित लेख