Shina NC interview to Sarkarnama | Sarkarnama

पुरणपोळी आणि आमटी खूप आवडते : शायना एनसी

सुचिता रहाटे
शुक्रवार, 21 एप्रिल 2017

भाजपच्या प्रवक्त्या आणि फॅशनच्या दुनियेत रामणाऱ्या शायना एनसी यांनी सरकारनामाशी मनमोकळ्या गप्पा मारल्या आहेत. ४४ वर्षीय शायना या यशस्वी राजकारणी असून फॅशन डिझायनर व सामाजिक कार्यकर्ता म्हणूनही प्रसिद्ध आहेत.

मुंबई- भाजपच्या प्रवक्त्या आणि फॅशनच्या दुनियेत रामणाऱ्या शायना एनसी यांनी सरकारनामाशी मनमोकळ्या गप्पा मारल्या आहेत. ४४ वर्षीय शायना या यशस्वी राजकारणी असून फॅशन डिझायनर व सामाजिक कार्यकर्ता म्हणूनही प्रसिद्ध आहेत.

२००४ मध्ये त्यांनी भारतीय जनता पक्षात माध्यमातून राजकारणात प्रवेश केला. शायना एनसी यांचे पती मनीष मुनोत , मुलगी शनाया व मुलगा अयान असा परिवार आहे. शायना एनसी यांनी राजकारणात आल्यानंतर उत्तम सामाजिक कार्यकर्त्या म्हणूनही नावलौकीक मिळवला. फॅशन जगतात त्यांना 'क्वीन ऑफ ड्रेप' असंही म्हटले जाते. साडी ड्रेपिंगसाठी त्यांना केवळ २० सेकंद लागतात तर एक साडी ५४ स्टाइल्सने नेसवणं हे त्यांचं खास वैशिष्ट्य. जगातल्या सर्वात जलद गतीने साडी नेसवण्याचा विक्रमही त्यांच्या नावे आहे याची दखल  'गिनीज बुक' ने घेतली आहे.

फॅशन डिझायनर म्हणून काम करत असताना राजकारणात यावे असे कधी वाटले?
राजकारणात यायच हे लहानपणीच ठरविले होते. मी स्वतः हजारो जनमानसात खुलेआमपणे बोलू शकते, माझं वक्तृत्व चांगलं होते तसेच राजकारणी म्हणून नावलौकिस येण्यासाठीच्या सगळ्या गुणांनी परिपक्व होते. त्यामुळेच भारतीय जनता पक्षाची प्रवक्ताची कमान चांगल्याप्रकारे सांभाळत आहे.

तुमचे राजकारणातील आणि कार्यक्षेत्रातील आदर्श कोण?
राजकारणात यायचे जेव्हा ठरविले तेव्हा बऱ्याच लोकांनी नावे ठेवली. म्हणाले, साडी नेसवणारी बाई काय करणार राजकारणात येऊन आणि किती टिकणार अशा अनेक काॅमेंट्सना मी सामोरे गेले. परंतु त्या परिस्थितही न डगमगता माझे काम चालूच ठेवले. यासाठी मला भाजपच्या अनेक नेत्यांनी मदत केली. राजकारण्यातले नरेंद्र मोदी व लालकृष्ण अडवाणी हे माझे आदर्श आहेत. तसेच कार्यक्षेत्रातील देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार आदींनी माझ्या राजकारणाच्या कारकीर्दीत खूप मदत केली.

समाजकारण आणि राजकारण या सगळ्या मधून स्वतःसाठी किती वेळ देता?
मला स्वतःसाठी अजिबात वेळ मिळत नाही. खासकरून, पती आणि मुलांना वेळ न देऊ शकल्याची खंत वाटते. मी स्वतःला समाजकारणात झोकून दिले आहे आणि यातच माझे मन रमते.

समाजकारण, राजकारण आणि फॅशन डिझायनर या सगळ्याचा मेळ कसा साधता?
या सगळ्याचा मेळ साधता साधता दमछाक होते. परंतु या सगळ्यासाठी माझी संपूर्ण टीम माझ्यासोबत काम करते त्यांची मला फारच मदत होते. समाजकार्य करायला फार आवडते. खासकरून महिला आणि त्यांच्यावर होणाऱ्या अत्याचारावर मी स्वतः पुढाकार घेऊन त्यांच्यासाठी लढते. सर्वधर्म समभाव मानते कारण आई बोहरी-मुसलमान, वडील राजपूत-सौराष्ट्र, पती मारवाडी-जैन आणि मी स्वतः मुंबईकर असल्यामुळे 'माणूस' हा एकाच धर्म पाळते.

समाजात महिलांवर वाढत्या अत्याचारांवर तुम्ही व्यक्तिकरित्या कसे पाहता व त्यासाठी सामाजिक कार्यकर्त्या म्हणून कशी भूमिका पार पाडता?
समाजात महिलांवरील अत्याचाराचा प्रमाण फारच वाढत आहे. मला स्वतःला मध्यंतरी आमच्याच पक्षातल्या मुलाने जवळजवळ ८०० अश्लील मेसेजेस पाठविले. मी राजकारणी असून मला इतका त्रास झाला तर सामान्य महिलांचे काय होत असेल यावरूनच मी "स्त्री-सन्मान" नावाची हेल्पलाईन सुरू केली आहे. कोणत्याही महिलेला कुठल्याही प्रकारचा त्रास किंवा छळ होत असेल त्यांनी या हेल्पलाईनवर संपर्क साधावा. आम्ही त्यांच्यासाठी हवी ती मदत करू.

अंतरंग
आवडता पदार्थ - पुरणपोळी आणि आमटी. सगळे महाराष्ट्रियन पदार्थ मला आवडतात.

आवडती मालिका - भारत एक खोज, संविधान आणि कॉफी विथ करण अशा मालिका आवडतात.

आवडते गाणे - शांत आणि शास्त्रीय संगीत ऐकायला फार आवडते.

आवडता पोशाख - आवडता पोशाख म्हणजे साडी, साडी आणि साडीच. साडीला आंतरराष्ट्रीय स्तरावर मला घेऊन जायचे स्वप्न आहे

फोटो फीचर

संबंधित लेख