shetti on modi | Sarkarnama

मोदींची सत्ता 2019 ला जाणार : राजू शेट्टी 

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 9 सप्टेंबर 2017

शेतकऱ्यांचे प्रश्‍नासाठी आम्ही "एनडीए' सोबत गेलो, पण अच्छे दिनच्या नावाखाली शेतकऱ्यांना देशोधडीला लावले आहे. दिलेली आश्‍वासने न पाळून भाजपने शेतकऱ्यांना फसविले आहे. कर्जमाफी आणि स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू झाल्या नाहीत तर 2019 ला नरेंद्र मोदींचे लाल किल्ल्यावरील भाषण शेवटचे ठरेल, असे भाकित स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, खासदार राजू शेट्टी यांनी केले. 

सातारा : शेतकऱ्यांचे प्रश्‍नासाठी आम्ही "एनडीए' सोबत गेलो, पण अच्छे दिनच्या नावाखाली शेतकऱ्यांना देशोधडीला लावले आहे. दिलेली आश्‍वासने न पाळून भाजपने शेतकऱ्यांना फसविले आहे. कर्जमाफी आणि स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू झाल्या नाहीत तर 2019 ला नरेंद्र मोदींचे लाल किल्ल्यावरील भाषण शेवटचे ठरेल, असे भाकित स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, खासदार राजू शेट्टी यांनी केले. 

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या मेळाव्यात खासदार शेट्टी बोलत होते. यावेळी पश्‍चिम महाराष्ट्र अध्यक्ष प्रकाश बालवडकर, जिल्हाध्यक्ष अर्जूनराव साळुंखे, नितीन यादव, युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष धनंजय महामुलकर, पुणे जिल्हाध्यक्ष राजेंद्र ढवाण पाटील, उपाध्यक्ष राजू शेळके, तालुकाध्यक्ष रमेश पिसाळ, कऱ्हाडचे देवानंद पाटील, कोरेगावचे जिवन शिर्के, खटावचे सुर्यकांत भुजबळ, फलटणचे नितीन यादव, कऱ्हाडचेसचिन नलवडे, असलम तडसरकर यांची प्रमुख उपस्थिती होती 

शेट्टी म्हणाले, कर्जमुक्ती आणि स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी प्रमाणे हमी भाव हीच आमची आता लढाई असेल. त्यासाठी येत्या 16 सप्टेंबरपासून आम्ही दक्षिण भारतात किसान मुक्ती यात्रा सुरू करत आहोत. त्यानंतर दोन ऑक्‍टोबरला चंपारण्यला आम्ही जाणार आहोत. या दिवशी महात्मा गांधींच्या चंपारण्य आंदोलनाला शंभर वर्षे पूर्ण होणार आहेत. आंदोलनाच्या पाचव्या टप्प्यात 20 नोव्हेंबरला हिवाळी अधिवेशनात देशभरातून दहा लाख शेतकरी दिल्लीत नेणार असून या शेतकऱ्यांपुढे मोदी सरकारला गुडघे टेकायला लावणार आहोत. 

शेट्टी म्हणाले, शेतकरी मोठ्या प्रमाणात उत्पादन घेत असताना शेतमाल आयात करण्याचा घाट घातला जात आहे. हे सरकार शेतकरी विरोधी असून शेतमालाची 28 हजार कोटीची आयात आता एक लाख 40 हजार कोटींवर तर 42 हजार कोटींची निर्यात 32 हजार कोटींवर आली आहे. पामतेलाच्या आयातीमुळे सोयाबीनचे दर घसरले आहेत. सर्जिकल स्ट्राईक करणाऱ्या या सरकारने देशाचा शत्रू असलेल्या पाकिस्तानातून कांदा आयात करण्याचे पाप केले आहे. या सरकारचे धोरण हे मर मर जवान...मर मर किसान... असे आहे. बड्या व्यवसायिकांनी नऊ लाख कोटींची कर्जे बुडवली. पण 70 कोटीची शेतकऱ्यांची कर्जे माफ करायला सरकार तयार नाही. हे उद्योगधार्जिणे सरकार आहे. शेतकऱ्यांविषयी दुटप्पीपणाने वागत आहे. अनिष्ठ स्पर्धेमुळे टेलिकॉम कंपन्यांना कर्जमाफी द्या, असे अरूंधती रॉय म्हणत आहेत. दुसरीकडे शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची प्रथा पाडु नका असा सल्ला देत आहेत. एकुणच शेतकऱ्यांच्या बाजूने बोलायला कोणीही तयार नाहीत. त्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना स्वत:च्या हिमतीवर जागृती करणार आहोत, असे त्यांनी सांगितले. 

यावेळी कपिल पाटील, सचिन नलावडे, पांडुरंग शिंदे, विकास पाटील, राजू शेळके, आदीसह शेतकरी व कार्यकर्ते उपस्थित होते. नितीन यादव यांची जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याचे खासदार शेट्टी यांनी जाहीर केले. 
 

संबंधित लेख