Shetti keeping distance form CM | Sarkarnama

शेट्टींची शिवसेनेसोबत गट्टी, मुख्यमंत्री दौऱ्याला सुटी 

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 19 मे 2017

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उद्या (ता.19) होणाऱ्या जिल्हा दौऱ्याला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, खासदार राजू शेट्टी यांनी दांडी मारली आहे. भाजपबरोबरच कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्याविरुद्ध आक्रमक पवित्रा घेतलेल्या शेट्टींनी सध्या शिवसेनेसोबत गट्टी केली असून नाशिक येथे होणाऱ्या शिवसेनेच्या कृषी अधिवेशनात ते मार्गदर्शन करणार आहेत. 

सांगली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उद्या (ता.19) होणाऱ्या जिल्हा दौऱ्याला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, खासदार राजू शेट्टी यांनी दांडी मारली आहे. भाजपबरोबरच कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्याविरुद्ध आक्रमक पवित्रा घेतलेल्या शेट्टींनी सध्या शिवसेनेसोबत गट्टी केली असून नाशिक येथे होणाऱ्या शिवसेनेच्या कृषी अधिवेशनात ते मार्गदर्शन करणार आहेत. 

मुख्यमंत्री फडणवीस शुक्रवारी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून हा शत्‌प्रतिशत सरकारी दौरा आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नूतन इमारतीचे उद्‌घाटन, रस्ते व जलशिवार योजनेची पाहणी आणि आढावा बैठक असा कार्यक्रम आहे. खासदार राजू शेट्टी हे हातकणंगले मतदार संघातून विजयी झालेत, त्यात इस्लामपूर आणि शिराळा हे दोन विधानसभा मतदार संघ येतात. त्यामुळे सहाजिकच प्रोटोकॉलप्रमाणे खासदार शेट्टी यांना या कार्यक्रमाचे प्राधान्याने आमंत्रण आहे. आढावा बैठकीत खासदार म्हणूनही त्यांची हजेरी महत्त्वाचीच असेल. परंतु, शेट्टींनी भाजप सरकारविरुद्ध रणशिंग फुंकले आहे. येत्या 22 मे पासून ते आत्मक्‍लेष पदयात्रा काढून सरकारचा निषेध नोंदवणार आहेत. 

दुसरीकडे स्वाभिमानी संघटनेतील त्यांचे सहकारी सदाभाऊ खोत यांच्याशी त्यांचा सवतासुभा सुरू आहे. उद्याच्या दौऱ्यात जिल्ह्यातील एकमेव मंत्री म्हणून सदाभाऊ पुढे असणार आहेत. अशा वेळी शेट्टींनी या दौऱ्यावर अघोषित बहिष्काराची भूमिका घेतली आहे. त्यांनी सध्या शिवसेनेसोबत जुळवून घेतले आहे. त्यामुळे त्यांनी नाशिक येथे होणाऱ्या शिवसेनेच्या कृषी अधिवेशनाला हजेरी लावणार आहेत. सदाभाऊंचे पुत्र सागर यांचा भाजप प्रवेशाचा इशारा, स्वाभिमानीतील संघर्ष या पार्श्‍वभूमीवर शेट्टींची या दौऱ्यातील गैरहजेरी चर्चेचा विषय बनणार आहे.

संबंधित लेख