shetti and khot | Sarkarnama

सदाभाऊंचे "टार्गेट' शेट्टीच ! भडास काढली ! 

निवास चौगले 
शुक्रवार, 5 मे 2017

"एका म्यानात दोन तलवारी बसत नाहीत' याचा अनुभव या दोघांच्या बाबतीत येत आहे. दोघेही आक्रमक, गावरान भाषा आणि शेतकरी प्रेमाने भारावून गेलेले. पण श्री. खोत यांना मंत्रिपद मिळाल्यानंतर दोघांत अंतर निर्माण झाले आहे आणि ते दिवसेंदिवस वाढत आहे. 

कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर कर्जमुक्तीसाठी काढलेल्या मोर्चात राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी आपल्या भाषणात संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनाच "टार्गेट' केल्याची चर्चा आहे. श्री. खोत यांचा रोख श्री. शेट्टी यांच्यावरच होता, हे श्री. शेट्टी यांच्या चेहऱ्यावरील हावभावावरून दिसून आले. 

श्री. खोत यांनी मुलाला जिल्हा परिषद निवडणुकीत उतरल्यानंतर श्री. शेट्टी यांच्याकडून झालेली बोचरी टीका, सदाभाऊ म्हणजे "स्वाभिमानी' नव्हे ही प्रतिक्रिया या पार्श्‍वभूमीवर मोर्चाच्या निमित्ताने मिळालेल्या संधीचे सोनं करताना श्री. खोत यांनी आपल्या मनातील खदखदच व्यक्त केली. 

भाजपला ग्रामीण चेहरा व एक शेतकरी नेता हवा होता. सदाभाऊंच्या रूपाने तो मिळाला. त्यांनाच पक्षात घेऊन पश्‍चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची ताकद आपल्याकडे वळविण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे अशी श्री. खोत यांची ओळख निर्माण करण्यात आली, त्यांच्याकडे आणखी एका खात्याचा अतिरिक्त कार्यभारही देण्यात आला. त्यानंतर शेट्टी यांनी सातत्याने भाजप आणि खोत यांना लक्ष्य केले आहे. 

श्री. शेट्टी यांच्यावरील राग व्यक्त करण्याची संधी श्री. खोत शोधत होते, मोर्चाच्यारूपाने त्यांना ही संधी मिळाली व त्यांनी सडकून अप्रत्यक्षरीत्या श्री. शेट्टी यांनाच "टार्गेट' केले. मी लढणारा वाघ, मिशा नसल्यापासून आंदोलनात आहे. व्हाट्‌सऍप किंवा फेसबुकवर तयार झालेला नेता नाही यासारखी शब्दफेक करून त्यांनी श्री. शेट्टी यांच्यावर निशाणा साधला. अलीकडे श्री. शेट्टी व्हाट्‌सअप व फेसबुकवरच जास्त झळकत आहेत हे जाणूनच श्री. खोत यांनी त्यांच्यावर टीकास्त्र केले. 

 

संबंधित लेख