shekhar gore dcc issue | Sarkarnama

शेखर गोरे तज्ज्ञ कसे ?; राष्ट्रवादीपुढे पेच! 

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 1 ऑगस्ट 2017

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेवर तज्ज्ञ संचालक नेमताना सदर व्यक्ती ही बॅंकिंग क्षेत्रातील अनुभवी असावी, सीए, वकिल किंवा निवृत्त बॅंक अधिकारी असावी असा निकष आहे. त्यामुळे जिल्हा बॅंकेतील तज्ञ संचालकांची नियुक्ती राष्ट्रवादीच्या नेत्यांसाठी अडचणीची ठरली आहे.

सातारा : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेवर तज्ज्ञ संचालक नेमताना सदर व्यक्ती ही बॅंकिंग क्षेत्रातील अनुभवी असावी, सीए, वकिल किंवा निवृत्त बॅंक अधिकारी असावी असा निकष आहे. त्यामुळे जिल्हा बॅंकेतील तज्ञ संचालकांची नियुक्ती राष्ट्रवादीच्या नेत्यांसाठी अडचणीची ठरली आहे. त्यामुळे माणचे नेते शेखर गोरे यांना जिल्हा बॅंकेवर तज्ञ संचालक म्हणून घेण्यातील अडचणी वाढल्या आहेत. 

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेवर राष्ट्रवादीची सत्ता आहे. बॅंकेत कॉंग्रेसचे आमदार जयकुमार गोरे आणि माजी आमदार विलासराव पाटील उंडाळकर हे दोन विरोधी गटाचे संचालक आहेत. बॅंकेच्या कामकाजावर आमदार गोरेंनी पहिल्यापासून चांगलेच लक्ष ठेवले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या नेत्यांना प्रत्येक पाऊल जपून टाकावे लागत आहे. तज्ज्ञ संचालक नेमताना सदर व्यक्ती ही बॅंकिंग क्षेत्रातील अनुभवी असावी, सीए, वकिल अधिकारी म्हणून काम केलेली व्यक्ती असावी, अशा शासनाच्या सूचना आहेत. या निकषात बसणाऱ्या व्यक्तीलाच तज्ज्ञ संचालक म्हणून नियुक्ती करता येते. त्यामुळे राष्ट्रवादीच्या नेत्यांपुढे शेखर गोरेंना संचालक करण्यातील अडचणी वाढल्या आहेत. मध्यंतरी जिल्हा बॅंकेवर तज्ज्ञ संचालक म्हणून विद्यमान जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे आणि कऱ्हाडचे आमदार बाळासाहेब पाटील यांना घेण्यात आले आहे. पण तेही तज्ज्ञच्या निकषात बसत नसल्याचे सांगितले जात आहे. मुळात माणचे नेते शेखर गोरे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यावेळी त्यांना जिल्हा बॅंकेवर तज्ज्ञ संचालक म्हणून घेण्याचा शब्द खुद्द माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला होता. तशी जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांनाही सूचना केली होती. पण या सूचनेकडे दूर्लक्ष केल्याने मध्यंतरी शेखर गोरेंनी अजित पवारांपर्यंत याबाबत तक्रारी केल्या. त्यानंतर शेखर गोरेंना जिल्हा बॅंकेवर संचालक म्हणून घेण्याच्या हालचाली सुरू झाल्या. पण आता तांत्रिक अडचणी पुढे आल्याने शेखर गोरेंबाबत राष्ट्रवादीचे नेते काय भुमिका घेणार, याचीच उत्सुकता आहे. 
 

संबंधित लेख