Shekap is commited for Farmers | Sarkarnama

शेतकऱ्यांचे हित जोपासण्यास शेकाप कायम कटीबध्द 

सुसेन जाधव 
बुधवार, 1 ऑगस्ट 2018

शेतीमालाला हमी भाव, रोजगार हमी चळवळ यासह कष्टकरी, शेतकऱ्यांसाठी शेकाप कायम कटिबद्ध आहे.

औरंगाबादः निवडणूकांची फुटपट्टी लावली तर शेतकरी कामगार पक्ष कमी भरेलही मात्र शेतकऱ्यांच्या हितासाठी प्रसंगी रक्त सांडून लढे देण्यात शेकाप कायमच अग्रस्थानी राहिला आहे.

शेतीमालाला हमी भाव, रोजगार हमी चळवळ यासह कष्टकरी, शेतकऱ्यांसाठी शेकाप कायम कटिबद्ध आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये याचे पडसाद उमटल्या शिवाय राहणार नाही अस सूर औरंगाबाद येथील शेतकरी कामगार पक्षाच्या 17 व्या अधिवेशनात काढण्यात आला. 

औरंगाबादेतील कर्णपूरा मैदानावर बुधवारपासून (ता. 1) शेकापच्या अधिवेशनास सुरवात झाली. अधिवेशनाच्या उद्‌घाटनप्रसंगी आमदार धैर्यशील पाटील शेकापची भुमिका स्पष्ट करताना म्हणाले, गोरगरिबांना मिळालेल्या साडेबारा टक्के जमिनी हे शेकापचे यश आहे. शेकाप पक्ष नेहमीच बहूजनांच्या हिताची भुमिका घेत आला आहे. मराठवाडा अजूनही शिक्षण, आरोग्य क्षेत्रात मागे आहे, मराठवाड्याला हक्काच्या पाण्यासाठी भांडावे लागते यासाठीही शेकाप पुढाकार घेईल असे आश्‍वासन त्यांनी दिले. 

दरम्यान नुसताच मराठीचा उदोउदो करणाऱ्या मनसे आणि हिंदूत्वाची पताका मिरविणाऱ्या शिवसेनेने शेतकऱ्यांसाठी काहीच केले नसल्याचा टोला माजी राज्यमंत्री मिनाक्षी पाटील यांनी आपल्या भाषणातून लगावला. 

यावेळी व्यासपीठावर भाई गणपतराव देशमुख, भाई जयंत पाटील, माजी राज्यमंत्री मिनाक्षी पाटील, विवेकानंद पाटील, माजी न्यायमुर्ती बी. एन. देशमुख, नरसय्या आडम आदिंची उपस्थिती होती. 

अंबानी- अदानीचे खिसे भरणे, हिंदूत्व आणि गोरक्षेच्या नावाखाली भाजपकडून केवळ राजकारण सुरू आहे. तर दुसरीकडे कष्टकऱ्यांची बाजू घेतल्याचा आवही सरकार आणत असल्याचा आरोप भाकपचे नेते प्रा. राम बाहेती यांनी केला.

जातीय राजकारण केल्याशिवाय भाजप सत्तेवर येऊ शकत नाही. 2019 च्या निवडणूकीसाठीही हाच त्यांचा अजेंडा आहे. शेतकऱ्यांची समस्यांच्या जोखडातून मुक्तता करण्यासाठी केवळ नरेंद्र मोदीच नाही तर भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि ब्राम्हणी वर्चस्वच आम्ही नाकारणार आहोत असेही बाहेती यांनी स्पष्ट केले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख