shaumika mahadik hatkanangale loksabha issue | Sarkarnama

सदाभाऊ खोतांना शेट्टींआधी लढावे लागणार महाडिकांशी! 

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 11 सप्टेंबर 2018

महादेवराव महाडिक यांची गोकुळवर सत्ता असून ते पुढील विधानपरिषदेच्या निवडणुकीची तयारी करत आहेत. 

कोल्हापूर : हातकणंगले मतदारसंघात आगामी लोकसभेसाठी भारतीय जनता पक्षाकडून आमदार महादेवराव महाडिक यांच्या स्नुषा, जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. शौमिका महाडिक यांना उतरवण्यासंबंधीची चाचपणी सुरु आहे. त्यामुळे येथील उमेदवारीसाठी तीव्र इच्छुक असलेल्या कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोतांना महाडिकांच्या तुलनेत स्वत:ची दावेदारी प्रबळ असल्याचे सिद्ध करावे लागणार आहे. 

राजू शेट्टी सद्या या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करत आहेत. त्यांच्याविरोधात भाजपकडून कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचे नाव चर्चेत आहे. त्यांनी त्यादृष्टीने बांधणी सुरु केली आहे. ते सातत्याने शेट्टी यांना आव्हान देत आहेत, मात्र भाजप इतर पर्यायांची चाचपणी करत आहे. त्यात शौमिका महाडिकांचे नाव आहे. 

हे नाव पुढे येण्यामागे महाडिकांचा शिरोळ ते शिराळा असलेला संबंधच महत्वाचा ठरत आहे. शिरोळ तालुक्‍यात गोकुळचे संचालक अनिल यादव यांच्यासह बहुजन विकास आघाडीचे अशोकराव माने, हिंदुराव नाईक निंबाळकर, विजय भोजे आदी महाडिकांसाठी सक्रीय राहतील. 

पन्हाळा-शाहूवाडीत गोकुळमुळे आमदार सत्यजित पाटील व भाजपमुळे माजी मंत्री कोरे यांची ताकत मिळणार आहे. वाळवा-शिराळा ही महाडिकांची जन्मभूमी आहे. तर त्यांचे बंधू नानासाहेब महाडिक कर्मभूमी आहे. महाडिक यांचे दोन्ही पुत्र सम्राट आणि राहूल यांनी गावोगावी युवा कार्यकर्त्यांचे जाळे निर्माण केले आहे.त्यामुळे शिरोळ पासून शिराळ्यापर्यंत महाडिक यांच्या कार्यकर्त्यांचे जाळे असल्याने त्यांच्या उमेदवारीसाठी आग्रह झाल्यास नवल नाही. 

महादेवराव महाडिक यांचे पुत्र स्वरुप महाडिक हे ताराराणी पक्षाचे प्रमुख आहेत. अमल महाडिक हे भाजपचे आमदार तर स्नुषा सौ. शौमिका महाडिक या जिल्हा परिषद अध्यक्षा आहेत. पुतणे धनंजय महाडिक हे राष्ट्रवादीचे खासदार आहेत. सांगली जिल्ह्यात महाडिक यांच्या वहिनी मिनाक्षीताई महाडिक या पेठ गावच्या लोकनियुक्‍त सरपंच आहेत. पुतणे राहूल महाडिक हे पंचायत समितीचे सदस्य आहेत. तर दुसरे पुतणे सम्राट महाडिक हे विधानसभेच्या तयारीत आहेत. महादेवराव महाडिक यांची गोकुळवर सत्ता असून ते पुढील विधानपरिषदेच्या निवडणुकीची तयारी करत आहेत. 

संबंधित लेख