shashikat shinde press | Sarkarnama

तीन मंत्री असूनही साताऱ्याची स्थिती वाईट 

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 16 मे 2017

वसनाचा दुसरा टप्पा आमच्या काळखंडात पूर्ण झाला आहे. वांगनाचा दुसरा टप्पा पूर्ण करण्यासाठी आम्हीच पाठपुरावा केला आहे. या अडीच वर्षात काहीच काम झालेले नाही. या प्रकल्पासाठी आवश्‍यक तेवढी तरतूद केली असती तर आतापर्यंत सोळशीला पाणी पोचले असते. अडीच वर्षात कोणते ठोस काम केले, मागील सरकारच्या काळातील तरतुदी आणि या सरकारच्या काळातील तरतूदीचा आढावा पालकमंत्र्यांनी मांडावा, असे शिंदे म्हणाले. 
 

सातारा : एकावर विश्‍वास नाही म्हणून दुसरा पालकमंत्री आणला तरीही निधीबाबत साताऱ्यात वाईट अवस्था आहे. गेल्या अडीच वर्षाच्या काळात जिहे-कठापूरसाठी एक रुपयाचीही तरतूद नाही, तरीही पालकमंत्री योजना पूर्ण करणार म्हणत आहेत. जिल्ह्यास तीन मंत्री असतानाही आरोग्य, शिक्षण, पाणी योजनांना निधी नाही. पालकमंत्री हतबल होऊन विधानसभेत प्रश्‍न मांडण्याची भाषा करत आहेत, हे त्यांचे अपयश आहे, अशी टीका राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते आमदार शशिकांत शिंदे यांनी केली. 

भिलार दौऱ्यावर आलेल्या शरद पवार यांनी कोण आहेत पालकमंत्री, अशी खोचक विचारणा केली होती. या टीकेला पालकमंत्री विजय शिवतारे यांनी शासकीय विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत उत्तर दिले होते. तसेच जिहे-कठापूर, वसना, वांगना योजनेची कामेपूर्ण करण्याचा निर्धार व्यक्त करत जलसंपदा विभागाचे काम पहिल्या क्रमांकाचे असल्याचे मत व्यक्त केले होते. या वक्तव्याचा आमदार शशिकांत शिंदेंनी जिल्हा बॅंकेत पत्रकार परिषद घेऊन समाचार घेतला. 

आमदार शिंदे म्हणाले, जिल्ह्यातील जनतेवर पवार साहेबांचे प्रेम आहे. ते विविध माध्यमातून आर्थिक साहाय्य करतात. त्यांची बरोबरी पालकमंत्र्यांनी कामातून करावी. नेत्यावर बोलून मोठे होण्यापेक्षा कामाने मोठे व्हावे. बोलण्याचा वेगळा अर्थ घेण्यापेक्षा त्यातून बोध घ्यावा. शिवसेना पक्ष प्रमुखांनी जलयुक्तमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला आहे. हे मात्र, सातारा जिल्ह्यात जलयुक्तमध्ये चांगले काम झाल्याचे सांगत आहेत. पक्षप्रमुखांची एक आणि यांची एक भूमिका, यातील नक्की खरे कोणाचे म्हणायचे, असा प्रश्‍न शिंदेंनी उपस्थित केला. 

जिहे-कठापूरला अडीच वर्षात निधीची तरतूद केली नाही. साठ कोटी मंजूर केल्याचे सांगत असले तरी प्रत्यक्षात वीस कोटीच खर्च केले आहेत. मागील सरकारच्या बजेटमधूनच हे पैसे मिळविले आहेत. नवीन सरकारने एक रुपयाही यामध्ये दिलेला नाही. सहामहिन्यात पाणी आणण्याचे सांगतात, परंतु 2019पर्यंत हे काम पूर्ण होईल, असे वाटत नाही. तीनशे कोटींची कठापूर योजनेला आवश्‍यकता आहे, असे शिंदे म्हणाले. 

 

संबंधित लेख