sharad pawar-udyanraje meetin at modibaug | Sarkarnama

मोदीबागेत आलेल्या उदयनराजेंना पवार म्हणाले, 'आठ दिवसांनी बघू'!

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 24 सप्टेंबर 2018

सकाळी उदयनराजे विरोधकांनी बारामतीत पवारांची भेट घेतली, तर संध्याकाळी पुण्यात उदयनराजे पवारांना भेटले. 

पुणे : सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादीअंतर्गत भडकलेल्या राजकारणाचा केंद्रबिंदू सोमवारी पुणे जिल्हा ठरला. सकाळी उदयनराजे विरोधकांनी बारामतीत पवारांची भेट घेतली, तर संध्याकाळी पुण्यात उदयनराजे पवारांना भेटले. 

दोन दिवसांपुर्वी पवार सातारा दौऱ्यावर होते. त्यावेळी राष्ट्रवादीचे आमदार, प्रमुख पदाधिकारी त्यांना भेटले. पवारांच्या स्वागताला स्वत: उदयनराजेही आले होते. मात्र या भेटीगाठींत अनेक घडामोडी घडल्या. 

रामराजे नाईक निंबाळकर, शिवेंद्‍र्रसिंहराजे भोसले, मकरंद पाटील, बाळासाहेब पाटील, शशिकांत शिंदे या आमदारांनी पुर्वीचीच भूमिका कायम ठेवत उदयनराजेंच्या संभाव्य उमेदवारीला विरोध केला. त्यामुळे उदयनराजेंनी  पवारांची भेट झाल्यानंतर "फसवाफसवी करु नका, मलाही कळतं', असा इशारा दिला. त्याचदरम्यान माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनी पक्षादेश आल्यास सातारा लोकसभेची निवडणूक लढणार, असे जाहीर केले. त्यामुळे उदयनराजेंची पुरती कोंडी झाल्याचे दिसले.

काल गणपती विसर्जन असल्याने थंडावलेला हा वाद आज पुन्हा भेटला. रामराजेंच्या नेतृत्वाखाली सर्व उदयनराजे विरोधक आमदार बारामती येथील गोविंदबाग या पवारांच्या निवासस्थानी त्यांना भेटले. सर्वांनी उदयनराजे सोडून दुसरा उमेदवार द्या, त्याला निवडून आणतो अशी एकमुखी मागणी केली. त्यानंतर रामराजे स्वत: पवारांच्या गाडीत बसून पुण्यापर्यंत आले.

या घडामोडी समजताच उदयनराजेंनी पवारांची वेळ घेतली. त्यानुसार सायंकाळी मोदीबाग येथील पवारांच्या निवासस्थानी त्यांची भेट झाली. उदयनराजेंनी आपली बाजू मांडली. त्यावर आठ दिवस थांबा, त्यानंतर आपण सर्वाशी चर्चा करुन मार्ग काढू, असे पवारांनी सांगितले. 

संबंधित लेख