sharad pawar on udayanraje | Sarkarnama

उदयनराजे, उद्योगी लोकांना दूर ठेवा... अडचणीत याल !

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 6 मे 2017

टंचाईचा आढावा घेत असताना शरद पवार यांनी मकरंद पाटील यांना कोण आहेत सातारचे पालकमंत्री ? असा खोचक सवाल केला. पुरंदर हे जिल्ह्याच्या हद्दीवर असल्याने ते नेहमीच येत असतील असा चिमटा त्यांनी काढला. तेव्हा आजूबाजूच्या नेत्यांनी इथलेच अधिकारी पुरंदरला जातात, अशी माहिती दिली. हे ऐकताच पवारांच्या भुवया उंचावल्या..!.

पाचगणी : आपल्या आजूबाजूला कोणाला बसवतो, कोणाला सोबत घेतो याचे तारतम्य बाळगले पाहिजे. सभोवतालची माणसे जर उद्योगी असतील तर आपण अधिक अडचणीत येतो. सार्वजनिक जीवनात आपली गोची करणारी माणसे नसावीत अन्यथा खूप अवघड होऊन बसते, असा उपरोधिक सल्ला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांच्याच पक्षाचे खासदार उदयनराजे भोसले यांना नाव न घेता दिला.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी रात्री भिलार येथे पत्रकारांशी दिलखुलास गप्पा मारल्या. शरद पवार खूप वेगळ्याच मूडमध्ये होते. खरे तर ते लवकर पत्रकार परिषद आटोपून निघाले होते. मात्र प्रश्नावर प्रश्न सुरू असल्यामुळे दिलखुलास बोलले. पत्रकार परिषद सुरू होतानाच त्यांनी सातारला बरे आहे काय..?, काय सुरू आहे, ठीक आहे ना, असे प्रश्‍न उपस्थित केले. त्यावर उपस्थित सर्वजण दिलखुलास हसले. पवार नेमके काय बोलणार आणि या पत्रकार परिषदेला सातारच्या पत्रकारांना नेमके का निमंत्रित केले, याची उत्सुकता अनेकांना होती. तरीही पवारांनी अगदी जाता जाता आपला इशारा कोणाकडे आहे, हे स्पष्ट केले.

पत्रकार परिषद संपत असतानाच त्यांनी सातारच्या विषयावर भाष्य केले. सातारच्या बातम्या तुमच्याकडे येतात का, अशी विचारणा त्यांना करताच येतात ना..!, असे ते म्हणाले. सातारवर लक्ष ठेवावे लागते. शेवटी सातारा छत्रपतींची राजधानी आहे. मात्र त्यावर आता भाष्य करणे योग्य नाही, असे ते म्हणाले.

माजी आमदार लक्ष्मण माने यांना आपण कायदेशीर प्रक्रियेला सामोरे जा, असे सांगितले होते. तोच सल्ला आपण खासदार उदयनराजे भोसले यांना देणार आहात काय, असे विचारले असता त्यांनी स्मितहास्य करत उत्तर दिले. ते म्हणाले, ती केस अजून मी वाचलेली नाही. त्याची माहितीसुद्धा घेतलेली नाही. पण कार्यकर्त्यांचे उद्योग नेत्याच्या अंगलट येत असतात. त्यामुळे आपल्या आजूबाजूला वावरणारे कोण आहेत याची शहानिशा करणे खूप चांगले असते. नको ती उद्योगी माणसे नेहमी आपणास अडचणीत आणत असतात. सार्वजनिक जीवनात मी नेहमी हे तारतम्य बाळगले आहे.

 

संबंधित लेख