Sharad Pawar takes government to task | Sarkarnama

आरक्षणाच्या घोषणा म्हणजे लबाडाच आवतण: शरद पवार

दत्ता देशमुख 
सोमवार, 1 ऑक्टोबर 2018

बेरोजगारीबाबत पंतप्रधान मोदींचे लक्ष नाही. त्यांची मनकी बात म्हणजे फक्त माझं ऐका मी कोणाचेही ऐकणार नाही असे आहे.

-शरद पवार 

बीड : "पंतप्रधान फक्त मनकी बात ऐकवितात. पण, बेरोजगार, गृहीणी, अल्पसंख्यांक, शेतकऱ्यांचे दुखणे ऐकायला त्यांचे कान बहिरे झाले आहेत. विविध घोषणा करणारे राज्य आणि केंद्र सरकार लबाड आहेत. लबाडाच आमंत्रण जेवल्याशिवाय खरं नाही. त्यामुळे लबाडं घालविल्याशिवाय पर्याय नाही," असा घणाघात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी केला. 

बीडच्या राष्ट्रवादीच्या विजयी संकल्प मेळाव्यात शरद पवार यांनी  जुनी ग्रामीण गोष्ट सांगितली आणि एकच हशा पिकला.ते म्हणाले, '' एकाने गावात दवंडी पिटली .  गावाला जेवायला बोलविले. फक्त ताट - वाटी घेऊन बुंदीचे जेवायला येण्याचा निरोप दिला. महिलांनाही वाटले  चला एक दिवस चुल पेटविण्याचे वाचले. सर्व गाव जमले आणि पाहतात तर काय  निमंत्रण देणाराच गायब झाला  होता. तेंव्हापासून अशी म्हण  आहे की , लबाडाचे आवतण जेवल्याशिवाय खरे नाही . "

" तसेच या सरकाच आहे. मराठा, मुस्लिम, धनगर, लिंगायत समाजाला आरक्षण देण्याची घोषणा केली. बारामतीमध्ये मेळावा घेऊन पहिल्या कॅबीनेटमध्ये आरक्षण देणार असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. आतापर्यंत शेकडो बैठका झाल्या मात्र आरक्षण नाही. मराठा समाजालाही आरक्षण देणारच म्हणतात पण केव्हा ते सांगत नाहीत. त्यामुळे हे लबाड सरकार घालविल्याशिवाय पर्याय नाही ,"असे आवाहन शरद पवार यांनी केले. 

" शेतकरी हा देशाचा कणा आहे. कर्जबाजारीपणातून शेतकरी आत्महत्या होत आहेत. उद्योगपती आणि धनदांडग्यांनी बँकांचे बुडविलेले ८१ हजार कोटी रुपयांचे कर्ज माफ करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाझर फुटला. मात्र, शेतकरी आत्महत्यांकडे डोकून पहायला सरकारला वेळ नाही.  आम्ही . सत्तेत असताना ७१ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी केली. सध्या दुष्काळी परिस्थिती असून बीडसारखा दुष्काळ असेल तर शंभर टक्के कर्जमाफीची गरज आहे. "

"पण, या सरकारला शेतकऱ्यांच दुखण दिसत नाही. सत्ता मागताना भाववाढ होणार नाही म्हणणारे आता गप्प आहेत. सत्ता ही सामान्यांच्या हितासाठी आवश्यक आहे. पण, देशात नरेंद्र मोदी आणि राज्यातील देवेंद्र फडणवीस यांच्या सत्तेमुळे समाजातील सर्व घटक दु:खी आहेत. परिवर्तन केल्याशिवाय गत्यंतर नाही," असे शरद पवार म्हणाले.

संबंधित लेख