Sharad Pawar takes care of NCP worker's family | Sarkarnama

दुःखाचा डोंगर कोसळलेल्या कार्यकर्त्याच्या कुटुंबावर पवारांनी धरले मायेचे छत्र...

गणेश पांडे
शनिवार, 29 डिसेंबर 2018

नवले कुटुंबियाची आर्थिक परिस्थिती साधारण आहे. ही माहिती समजताच शरद पवारांनी तातडीने पाच लाख रुपयांचा धनादेशही  आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्याकडे सुपूर्द केला. 

परभणी : परभणी येथील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते ऍड. विष्णू नवले पाटील यांचे तरुणवयात अकाली निधन झाले. पक्षाच्या विविध उपक्रमांच्या निमित्ताने नवले पाटील पक्षाध्यक्ष शरद पवार यांना भेटलेले होते. त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच शरद पवार यांनी हळहळ व्यक्त केली आणि नवले पाटील यांच्या कुटुंबावर मायेचे छत्र धरले. 

अँड. विष्णू नवले-पाटील यांचे 12 डिसेंबर रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या स्थापनेपासून पक्षाचे काम करणाऱ्या अँड. विष्णू नवले-पाटील यांना शरद पवार यांनी परभणी महानगरपालिकेचे स्वीकृत सदस्य केले होते. त्यांच्या निधनाची बातमी राष्ट्रवादी कॉग्रेसचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांना कळाली. त्यांनी पक्षाचे जिल्हाध्यक्ष आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्याशी चर्चा करून नवले कुटुंबाची माहिती घेतली माहिती घेतली. 

कै नवले पाटील यांच्यामागे पत्नी सात वर्षांची मुलगी आणि चौदा वर्षाचा मुलगा असा परिवार आहे. नवले कुटुंबियाची आर्थिक परिस्थिती साधारण आहे. ही माहिती समजताच शरद पवारांनी तातडीने पाच लाख रुपयांची मदत कुटुंबियाना द्यावी असे बाबाजानी यांना सांगितले. या रक्कमेचा धनादेशही स्वतः शरद पवारांनी आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्याकडे सुपूर्द केला. 

आमदार बाबाजानी दुर्राणी म्हणाले, "मला पवार साहेबांचा निरोप आला. त्यामुळे मी मुंबईला लगोलग गेलो. तेथे त्यांनी माझ्याकडून नवले यांच्या कुटूंबियाची माहिती घेतली. व तातडीने मला पाच लाख रुपयाचा धनादेश देऊन तो नवले कुटूंबियांना द्यावा असे आदेश दिले. आपल्या कार्यकर्त्यांची आणि त्यांच्या परिवाराची काळजी पवार साहेब कशी घेतात हे यानिमित्ताने सर्वांना कळले. नवले पाटील यांच्या कुटुंबातील सदस्यांना कसल्याही प्रकारची अडचण असेल तर सोडविण्याचा निश्‍चितच प्रयत्न करेल असा शब्द मी पवार साहेबांना दिला आहे.' 

रोहित पवार हे परभणीला जाणार होते. त्यांनाही शरद पवार यांनी नवले पाटील यांच्या घरी जाऊन येण्यास सांगितले होते. त्यानुसार रोहित पवार यांनी नवले पाटलांच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले. तसेच त्यांच्या मुला - मुलीच्या शिक्षणाची संपूर्ण जबाबदारीही त्यांनी स्वीकारली आहे. 

संबंधित लेख