अतिशुध्द साखरेवरील निर्यातबंदी उठविण्यासाठी प्रयत्न : शरद पवार 

अतिशुध्द साखरेवरील निर्यातबंदी उठविण्यासाठी प्रयत्न : शरद पवार 

शिराढोण ः शेतकरीहितासाठी अतिशुद्ध (रिफायनरी) साखरेवरील निर्यातबंदी उठवावी, यासाठी कारखान्यांच्या वतीने सरकारकडे आपले प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांनी दिली. 

रांजणी (ता. कळंब) येथील नॅचरल उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष बी. बी. ठोंबरे यांच्या जीवनकार्यावर विद्याधर कांदे -पाटील यांनी लिहिलेल्या "साखरनामा' या पुस्तकाचे प्रकाशन, "नॅचरल शुगर ऍन्ड अलाईड इंडस्ट्रीज' (एन- साई)मध्ये यंदाच्या हंगमात उत्पादित 14 लाख 11 हजार 111 व्या साखरपोत्याचे पूजन शनिवारी (ता. तीन) श्री. पवार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.

माजी राज्यपाल शिवराज पाटील चाकूरकर अध्यक्षस्थानी होते. विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, माजी मंत्री डॉ. पद्मसिंह पाटील, राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, आमदार दिलीपराव देशमुख, राणाजगजितसिंह पाटील, सतीश चव्हाण, विक्रम काळे, अमरसिंह पंडित, राजेश टोपे, राहुल मोटे, त्र्यंकटराव भिसे, संगीता ठोंबरे आदी उपस्थित होते. 

श्री. पवार म्हणाले, "कारखान्यांनी अतिशुद्ध साखरेचे उत्पादन करावे. सध्या अतिशुद्ध साखरेला निर्यातबंदीचा सामना करावा लागत आहे. भाजप सरकारने निर्यातबंदी उठवावी, यासाठी प्रयत्नशील आहोत. कमीत कमी पाणी, कमी कालावधीत ऊस कसा परिपक्व होईल, याचे संशोधन गरजेचे आहे. त्यानुसार ऊसात जनुकीय बदल करून संशोधित वाण निर्मितीचा प्रयत्न आहे. ऊस, साखर निर्मितीबरोबर ठोंबरे यांनी विविध उपपदार्थ निर्माण केले. ऊसशेतीला जोडधंदा म्हणून दुग्धव्यवसाय सुरू करून त्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा आदर्श निर्माण केला. विश्‍वस्त म्हणून त्यांनी "वसंतदादा शुगर इन्स्टिट्युट'ची धुरा स्वीकारावी. त्याद्वारे साखर कारखानदारीस योग्य दिशा मिळेल. शेतकरी, कारखान्याचे हित जोपासून प्रगती करताना कारखानदारांनी कोणत्याही शासकीय अनुदानाची वाट न पाहता नॅचरल उद्योग समूहाप्रमाणे काम करावे'. 

श्री. चाकूरकर म्हणाले की, "अन्य देशांच्या तुलनेत कौशल्य निपुणता भारतात फक्त तीन टक्के आहे. कौशल्य निपुणता असल्याने श्री. ठोंबरे यांनी 17 वर्षांत 21 प्रकल्पांची उभारणी केली. शेती व कारखानदारी कशी चालवायची, याचा उहापोह साखरनामा या पुस्तकात आहे. त्यामुळे हे पुस्तक मार्गदर्शक आहे'. 

आमदार देशमुख यांनीही विचार मांडले. श्री. ठोंबरे यांनी प्रास्ताविक केले. कारखान्याचे संचालक पांडुरंग आवाड यांनी सूत्रसंचालन केले व आभार मानले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com