Sharad Pawar Shriniwas Patil Together in a Car from Pune to Satara | Sarkarnama

शरद पवार व श्रीनिवास पाटील पुणे-सातारा प्रवासात काय बोलले?

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 4 ऑक्टोबर 2018

सातारा लोकसभेसाठी राष्ट्रवादीच्या जिल्ह्यातील नेत्यांनी विद्यमान खासदार उदयनराजे भोसले यांच्या 2019 च्या निवडणुकीसाठी उमेदवारीला विरोध आहे. या पार्श्वभूमीवर मागील वेळी पवार सातारा दौऱ्यावर आल्यावेळी उदयनराजे यांनी आमदारांना दमबाजी तर उमेदवारीबाबत फसवल्यास आम्हालाही कळते, असे सूचक विधान केले होते. याच वेळी श्रीनिवास पाटील यांनी आपण साताऱ्यातून खासदारकीसाठी इच्छुक असून साहेबांनी सुचना केल्यास आपण तयार असल्याचे सांगितले होते. 

सातारा - रयत शिक्षण संस्थेच्या  शताब्दी महोत्सव प्रारंभ कार्यक्रमाला आज रयत शिक्षण संस्थेचे व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार आणि सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील पुण्यातून साताऱ्याला एकाच गाडीतून आले. त्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा सातारा लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीबाबत चर्चेला मुद्दा मिळाला.

सातारा लोकसभेसाठी राष्ट्रवादीच्या जिल्ह्यातील नेत्यांनी विद्यमान खासदार उदयनराजे भोसले यांच्या 2019 च्या निवडणुकीसाठी उमेदवारीला विरोध आहे. या पार्श्वभूमीवर मागील वेळी पवार सातारा दौऱ्यावर आल्यावेळी उदयनराजे यांनी आमदारांना दमबाजी तर उमेदवारीबाबत फसवल्यास आम्हालाही कळते, असे सूचक विधान केले होते. याच वेळी श्रीनिवास पाटील यांनी आपण साताऱ्यातून खासदारकीसाठी इच्छुक असून साहेबांनी सुचना केल्यास आपण तयार असल्याचे सांगितले होते. 

यानंतर साताऱ्यातील आमदारांनी बारामती येथे जाऊन आपले मत पवार यांच्यापुढे मांडले होते. तसेच उदयनराजे यांनीही पवार यांची भेट घेऊन चर्चा केली होती. हे सर्व होऊनही पवार यांनी उदयनराजेंविषयी कोणाची ही नाराजी नसल्याचे स्पष्ट केले होते. त्यानंतर आज पवार रयत शिक्षण संस्थेच्या शताब्दी महोत्सवाच्या प्रारंभ कार्यक्रमाला पुण्याहून साताऱ्याला येत असताना श्रीनिवास पाटील त्यांच्या गाडीतून आले. त्यामुळे पुन्हा एकदा सातारा लोकसभेच्या उमेदवारीबाबत चर्चा सुरू झाली. 

आता पुणे ते सातारा प्रवासात गाडीत दोघात काय चर्चा झाली हे गुलदस्त्यात असले तरी राजकीय वर्तुळात मात्र याची चांगलीच चर्चा रंगली आहे. पवार साहेब कोणाला 'ग्रीन सिग्नल' देणार याची उत्सुकता आता आणखी ताणली आहे.

संबंधित लेख