Sharad Pawar Public meeting in Beed on 30th September | Sarkarnama

शरद पवार बीडमधून फुंकणार निवडणुकांचे रणशिंग; मुंडे, पंडित व सोळंकें जोरदार तयारीत गुंतले  

दत्ता देशमुख
शनिवार, 22 सप्टेंबर 2018

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार तीन वर्षानंतर प्रथमच जिल्ह्यात येत आहेत. विशेष म्हणजे आगामी निवडणुकांसाठी विजय संकल्प मेळावा होणार आहे. त्याची तयारी सध्या जोरात सुरु आहे. ५० हजारांची गर्दी हाेईल असे नियाेजन सुरु आहे.

बीड : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार तीन वर्षानंतर प्रथमच जिल्ह्यात येत आहेत. तर, विधानसभा निवडणुकीनंतर शहरातला हा त्यांचा पहिलाच दौरा आहे. आगामी सार्वत्रिक निवडणुकांच्या दृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेसचा विजयी संकल्प मेळावा म्हणजे निवडणुकांचे रणशिंग येथूनच फुंकले जाणार आहे. मेळावा जोरदार व्हावा यासाठी धनंजय मुंडे, अमरसिंह पंडित व प्रकाश सोळंके जोरदार तयारीला लागले आहेत.

शरद पवार यांचा ता. ३० सप्टेंबरला बीडमध्ये मुक्काम आहे. या दिवशी पवार यांच्या हस्ते एका खासगी रुग्णालयाचे उद॒घाटन होणार आहे. तर, ता. एक ऑक्टोबरला शरद पवार, पक्षाचे प्रदेशाध्यक्षा जयंत पाटील यांच्या उपस्थितीत पक्षाचा विजय संकल्प मेळावा बीडमध्ये होणार आहे. विजय संकल्प मेळावा म्हणजे पवार आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकांच्या प्रचाराचे येथून रणशिंगच फुंकणार आहेत. बीड येथील श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुलाच्या मैदानावर होणाऱ्या मेळाव्याला ५० हजारांची गर्दी होईल असा विश्वास आणि त्यादृष्टीने पक्षाच्या जिल्ह्यातील नेत्यांनी तयारी सुरु केली आहे. 

विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, प्रदेश सरचिटणीस अमरसिंह पंडित, उपाध्यक्ष प्रकाश सोळंके यांचे तालुकानिहाय दौरे सुरु आहेत. पदाधिकाऱ्यांच्या बैठका आणि कार्यकर्ते मेळावे घेऊन आवाहन करण्यात येत आहेत. सर्वच तालुक्यांच्या ठिकाणी दौरे झाले आहेत. बैठका आणि मेळाव्यांना प्रतिसाद भेटत असल्याने मुंडे, पंडित व सोळंके अधिकच जोमात आहेत. दौऱ्याच्या उपस्थित राहणाऱ्यांसाठी तालुकानिहाय वाहनांचे नियोजनही केले आहे. 

रणशिंग फुंकणार; तिढा सोडविणार का
विजयी संकल्प मेळावा म्हणजे आगामी निवडणुकांच्या दृष्टीने रणशिंगच फुंकले जाणार आहे. दरम्यान, शरद पवार यांच्या दिड दिवसांच्या दौऱ्यात जिल्ह्यातील पक्षातील गटबाजीबाबत काय निर्णय होतो याकडेही पक्षावर निष्ठा असलेल्या मतदारांचे लक्ष लागून आहे. पवार तोडगा काढतात कि हा विषय दुर्लक्षित ठेवतात हे पहावे लागणार आहे.

संबंधित लेख