sharad pawar programme, aurangabad | Sarkarnama

देशाचा प्रश्‍न असेल तेव्हा आम्ही सर्व एक आहोत : शरद पवार 

सरकारनामा ब्युरो 
रविवार, 30 जुलै 2017

औरंगाबाद ः भारताची सीमा धोक्‍यात आहे, देश संकटातून जातोय असा इशारा देतांनाच, 1962 चा अनुभव पाहता युध्दाची भूमिका न घेता सामोपचाराने प्रश्‍न सोडवण्याचा सल्ला देतानाच भूतानशी केलेल्या कराराचे पालन करतानाच भारताच्या इंच न इंच जागेचे रक्षण करावे लागेल. देशाचा प्रश्‍न असेल तेव्हा आम्ही सर्व एक आहोत असा विश्‍वास राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी येथे व्यक्त केला. 

औरंगाबाद ः भारताची सीमा धोक्‍यात आहे, देश संकटातून जातोय असा इशारा देतांनाच, 1962 चा अनुभव पाहता युध्दाची भूमिका न घेता सामोपचाराने प्रश्‍न सोडवण्याचा सल्ला देतानाच भूतानशी केलेल्या कराराचे पालन करतानाच भारताच्या इंच न इंच जागेचे रक्षण करावे लागेल. देशाचा प्रश्‍न असेल तेव्हा आम्ही सर्व एक आहोत असा विश्‍वास राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी येथे व्यक्त केला. 

विधीमंडळ व संसदीय कार्याला पन्नास वर्ष पुर्ण झाल्याबद्दल औरंगाबादेत शरद पवारांचा सर्वपक्षीय नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, विधान सभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, मंत्री पंकजा मुंडे, कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवराज पाटील, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. 

या सत्काराला उत्तर देतांना त्यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीत व जडणघडणीत मराठवाड्याचे महत्व अधोरेखित करतांनाच मराठवाड्यातील दिलदारपणाचे तोंडभरून कौतुक केले. 

शरद पवार म्हणाले, की 1967 मध्ये कॉंग्रेसकडून निवडणुकीचे तिकीट मागितल, पण मिळण्याची शक्‍यता नव्हती. कुणालाही तिकीट द्या पण शरद पवारांना देऊ नका असा आदेशच पुणे कॉंग्रेसने काढला. महाराष्ट्रातील 288 जागांसाठीची यादी हातात पडली तेव्हा त्यात माझे नाव नव्हते. बारामतीतून मी निवडून येऊ शकत नाही असा अहवाल देण्यात आला होता. 288 पैकी किती जागा जिंकू असा सवाल यशवंतराव चव्हाणांनी नेत्यांना विचारला तेव्हा दोनशे जांगा जिंकण्याचा दावा केला गेला. 88 जागा कॉंग्रेस हरणार असे गृहीत धरून त्यात आणखी एक जागा वाढवा आणि बारामतीमधून शरद पवारांना तिकीट द्या अशी सूचना यशवंतरावांनी केली आणि मी पहिल्यांदा विधानसभेत पोहचलो. मला निवडणूकीत तिकीट मिळावे म्हणून मराठवाड्यातील विनायकराव पाटलांनी प्रयत्न केले होते. या दोन नेत्यांनी माझ्या पाठीशी शक्ती उभी केली नसती तर मी आज राजकारणात दिसलो नसतो. मला समाजकारणात उभ करण्याच काम मराठवाड्यातील नेत्यांनी केले. 

राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण, एस. एम.जोशी, उद्धवराव पाटील यांच्याकडून खूप काही शिकायला मिळाले म्हणून इथपर्यंत पोहचू शकलो असे सांगून शरद पवार म्हणाले, ""महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यात गेलो, इथली माणसं, इतिहास भूगोल समजला. एकदा हेलीकॉप्टरने मराठवाड्याच्या दौऱ्यावर होतो तेव्हा, पायलटला ठिकाण सापडत नव्हते, तेव्हा डोगंराच्या मागे तळ आहे, त्याच्या बाजूला एक गावं आणि तिथेच हेलिकॉप्टर उतरवण्यासाठी हेलीपॅड असल्याचे मी सांगितले अशी आठवण करून दिली. शंकरराव चव्हाण, डॉ. बापूसाहेब काळदाते यांच्याकडून राजकारणात सुसंस्कृतपणाने कसं वागाव हे शिकलो, शिवाजीराव देशमुख अतिशय उत्तम वक्ते होते, केशवराव सोनवणे, शिवराज पाटील, विलासराव देशमुख, सुंदराव सोळुंके, पद्मसिंह पाटील, केशरकाकू क्षीरसागर, गोपीनाथ मुंडे या सगळ्यांची साथ लाभली, हा माझ्या आयुष्यातला मोठा ठेवा आहे.'' 

किल्लारीचा भूकंप, नामांतराच्या प्रश्‍नावरून संतप्त विद्यार्थ्यांनी घातलेल्या जोड्यांच्या माळा, त्यानंतर झालेला नामविस्तार, स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ अशा सर्व जुन्या आठवणींना पवारांनी आपल्या भाषणात उल्लेख करत मराठवाड्याशी असलेले घट्ट नाते सांगितले. 

शेतकऱ्यांनी काय घोड मारलं 
देशातील 58 ते 60 टक्के शेतकऱ्यांची क्रयशक्ती सुधारल्याशिवाय हिंदूस्थान सुधारणार नाही असा इशारा देतांनाच उद्योगपती व कारखानदारांना 80 हजार कोटींचे कर्ज माफ केले, मग शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर चर्चा कशाला? शेतकऱ्यांना काय घोड मारलं असा जळजळीत सवाल शरद पवारांनी केला. शेतकऱ्याच्या मालाला उत्पन्न खर्चावर आधारित 50 टक्के भाव देण्याचा शब्द पाळा, शेतकरी गेला तरी कुणाच देण विसरत नाही असा टोला देखील शरद पवारांनी पंतप्रधानांचे नाव न घेता लगावला. 

हे पोरग कायम सभागृहात राहील 
1936 ते 52 च्या दरम्यान, माझी आई लोकल बोर्डाच्या निवडणुकीत निवडूण आली. 12 डिसेंबर 1940 मध्ये माझा जन्म झाला आणि चार दिवसांनी 16 डिसेंबरला आईला पुण्याला अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी मतदान करायला पुण्याला जाव लागलं. त्यावेळी आमच्याकडे गाडी नसल्यामुळे पाच तासांचा बस प्रवास करून आई माझ्यासह पुण्याला गेली आणि शंकरराव मोरेंसाठी हात उंचावून मतदान केलं. तेव्हा शंकरराव मोरे म्हणाले हे पोरग कायम सभागृहात राहिल. त्यांचे शब्द खरे ठरले त्यांच्या आशिर्वादानेच मी सातत्याने सभागृहात असल्याचे शरद पवारांनी सांगितले आणि त्यांच्या या वाक्‍याला उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट करत प्रतिसाद दिला.  

 

संबंधित लेख