sharad pawar press in kolhapur | Sarkarnama

मी ध्यानात काय ठेवलंय हे तुम्हाला लवकरच कळेल!

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 13 एप्रिल 2019

कोल्हापुरची जागा ही डॅमेज होण्याचे काही कारण नाही

कोल्हापूर : मी महाराष्ट्राभर फिरत असतो. तिथे कोण कोण, काय काय करतं, याची मला माहिती आहे. मी ते सर्व ध्यानात ठेवतो. मी ध्यानात काय ठेवलंय हे तुम्हाला लवकरच लक्षात येईल, असा सूचक इशारा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी यांनी कॉंग्रेसचे आमदार सतेज पाटील यांचे नांव न घेता दिला. 

दरम्यान, कोल्हापुरची जागा ही डॅमेज होण्याचे काही कारण नाही. डॅमेज झाली नसेल तर कंट्रोल करण्याचा प्रश्‍न येतोच कुठे, असा प्रश्‍न करून तुम्हाला निकालात हे समजेल, निकालानंतर मला भेटा, असेही श्री. पवार म्हणाले. 

शुक्रवारी (ता. 12) पेठ वडगांव येथे झालेल्या सभेत श्री. पवार यांनी आमदार पाटील यांना इशारा देताना "तुमचं ठरलंयत तर मी बी ध्यानात ठेवलंय' असा टोला लगावला होता. याबाबत श्री. पवार यांना आज पत्रकारांनी काय ध्यानात ठेवलंय, ज्यांना ठेवलंय त्यांनी तर ते लक्षात घेतले का ? असा सवाल केल्यानंतर श्री. पवार म्हणाले,"काय ध्यानात ठेवलंय हे तुम्हाला लवकरच कळेल.' 

जनता दलाचे ऍड. श्रीपतराव शिंदे यांच्याशी चर्चा झाली आहे. मात्र त्यांनी पाठिंब्याबाबत काही पत्रक दिले नसल्याचे ध्यानात आणून दिल्यानंतर पवार म्हणाले,"या पक्षाचे प्रमुख यांची आणि आमची आघाडी झाली आहे. कर्नाटकातही जनता दल कॉंग्रेससोबत आहे. त्यामुळे जनता दल हे भाजप बरोबर जाणार नाही, याची मला खात्री आहे, असे सांगत या प्रश्‍नावर अधिक बोलणे पवार यांनी टाळले. 
  
पश्‍चिम महाराष्ट्र हे नेहमीच टार्गेट असते. या निवडणुकीतही भाजपकडून लक्ष्य केले जात आहे. मंत्री चंद्रकांत पाटील हे पश्‍चिम महाराष्ट्र तर गिरीश महाजन हे खानदेशातील कर्तृत्ववान माणसं आहेत. ती पक्षातील लोकांना फोडत आहेत. लोकांच्या गरजा भागवून विरोधकात फूट पाडण्याचे काम काही वर्ग करत आहेत. जसे कोल्हापुरात चंद्रकांत पाटलांचे नाव येते, असा टोला पवार यांनी लावला.  

 

संबंधित लेख