sharad pawar in phltan | Sarkarnama

शेतकरी सरकारला "सरसकट' धक्का देतील : शरद पवार 

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 8 जुलै 2017

राज्य सरकार कर्जमाफीच्या गुंत्यात अडकले आहे. खरे तर शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे. सरसकट कर्जमाफीच्या मुद्‌द्‌याला अनुसरून सध्या सरकारची कसरत चालली आहे. घेतलेल्या निर्णयाची योग्य अंमलबजावणी झाली नाही, तर शेतकरी सरसकट धक्का दिल्याशिवाय राहणार नाहीत, असे मत खासदार शरद पवार यांनी व्यक्त केले. 

फलटण (जि. सातारा) : राज्य सरकार कर्जमाफीच्या गुंत्यात अडकले आहे. खरे तर शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे. सरसकट कर्जमाफीच्या मुद्‌द्‌याला अनुसरून सध्या सरकारची कसरत चालली आहे. घेतलेल्या निर्णयाची योग्य अंमलबजावणी झाली नाही, तर शेतकरी सरसकट धक्का दिल्याशिवाय राहणार नाहीत, असे मत खासदार शरद पवार यांनी व्यक्त केले. 

फलटण (जि. सातारा) येथील श्रीमंत मालोजीराजे बॅंकेच्या वतीने व बॅंकेचे संस्थापक अध्यक्ष श्रीमंत शिवाजीराजे नाईक निंबाळकर यांच्या प्रेरणेतून दिला जाणारा श्रीमंत मालोजीराजे स्मृती पुरस्कार श्री. पवार यांना विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते शुक्रवारी (ता.7) देण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते. 

श्री. पवार म्हणाले, श्रीमंत मालोजीराजे यांच्या नावाने मिळालेला पुरस्कार म्हणजे सासरच्या लोकांनी माहेरचा सत्कार केला, असेच म्हणावे लागेल. दुष्काळी भागासाठीही त्यांचे योगदान महत्त्वाचे मानले जाते. हा पुरस्कार मला प्रेरणा देणारा आहे. आज राज्यात सर्वदूर शेतकऱ्यांचे कर्जाचे ओझे कमी कसे होईल, अशी चर्चा आहे; पण अजून काही झालेले दिसत नाही. 1978 मध्ये मी राज्य शासनात गेलो, त्या वेळी दुष्काळी भागातील कर्जे माफ झाली. शेतकऱ्यांच्या मालाला किंमत चांगली मिळाली, तर कर्जमाफीची गरज नाही. सध्या त्यांची कर्जमाफीची मागणी चुकीची नाही. शासनाने सरसकट माफीचे पालन व्हावे. कर्जमाफीबाबत शासन अनेक अडचणी सांगत आहे. अडचणींमुळे सरसकट कर्जमाफी अयोग्य वाटते. मात्र 2009 पासून कर्जमाफीचा घेतलेला निर्णय पुरेसा नाही. कारण दीर्घ मुदतीची कर्जे यात बसत नाहीत. असलेल्या कर्जापैकी दीड लाख सोडून उर्वरित रक्कम कर्जापोटी बॅंकेत भरा मग कर्जमाफी मिळेल, असा निर्णय अर्थहिन वाटतो. एकत्र कुटुंबातील एका व्यक्तीलाच कर्जमाफी देण्याऐवजी शासनाने सर्व खातेदारांना कर्जमाफी द्यावी. मात्र, सर्वांना मदत करण्याची भूमिका यातून दिसत नाही. शिवाय, नियमित कर्ज भरणारांचे काय असा प्रश्‍न आहेच. कर्जमाफीत राजकारण नको. जाहीर केल्याप्रमाणे सरसकट कर्जमाफी झाली नाही, तर शेतकरी सरसकट धक्का दिल्याशिवाय राहणार नाहीत. म्हणून शासनाने समंजसपणाची भूमिका घ्यावी.''

बॅंकेचे संचालक व जिल्हा परिषद अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी प्रास्ताविकात बॅंकेच्या प्रगतीचा आढावा घेतला. योवळी खासदार सुप्रिया सुळे, विजयसिंह मोहिते पाटील, माजी आमदार कृष्णचंद्र भोईटे, विक्रमसिंह पाटणकर,आमदार बाळासाहेब पाटील, शशिकांत शिंदे, दीपक चव्हाण, प्रभाकर घार्गे आदी उपस्थित होते. 

संबंधित लेख