sharad pawar on modi | Sarkarnama

नरेंद्र मोदी "वर्कोहोलिक' : पवार

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 6 मे 2017

राष्ट्रपती पदासाठी आपल्या नावाची चर्चा सुरू आहे असे विचारले असता पवारांनी पुन्हा एकदा इच्छुक नसल्याचे नमूद केले. ते म्हणाले, माझ्या नावाच्या चर्चेत काही अर्थ नाही.

सातारा : अटलबिहारी वाजपेयी भारताचे पंतप्रधान असताना त्यांनी सामूहिकपणे काम करत टीमवर्क केले तर आताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एकटेच खूप काम करतात. काही माणसे अल्कोहोलिक असतात तसे मोदी हे वर्कोहोलिक आहेत, अशी टिप्पणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे गेले दोन दिवस महाबळेश्वर मुक्कामी असून शनिवारी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यांनी कर्जमाफी, केंद्र सरकारची भूमिका, राज्य सरकारचे दुष्काळाच्या अनुषंगाने सुरू असलेले प्रयत्न यावर भाष्य केले.

अटलबिहारी वाजपेयी आणि नरेंद्र मोदी यांच्या कार्यकालाची आपण कशी तुलना कराल, या प्रश्‍नावर ते म्हणाले, वाजपेयी यांच्या कालावधीत मी लोकसभानेता होतो. त्यावेळी वाजपेयी टीमवर्क करायचे. सर्वांना बरोबर घेऊन ते काम करते. वेगवेगळ्या विषयांवर त्यांची माणसे काम करत होती. मोदी यांचे तसे नाही. ते कामाने खूप झपाटलेले आहेत. मुळातच ते खूप (...) कष्टाळू आहेत. सकाळपासून संध्याकाळ पर्यंत ते कामच करतात. काही माणसे जशी अल्कोहोलिक असतात तसे ते वर्कोहोलिक आहेत. मोदी यांच्याकडे काम करणारी माणसे बरीच आहेत पण ते स्वतःच एकटे काम करतात, असेही ते म्हणाले.
 

संबंधित लेख