Sharad Pawar Mediates in Two Channels Dispute | Sarkarnama

शरद पवारांनी सोडवली दोन दूरचित्रवाणी वाहिन्यांमधील 'कुस्ती'

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 25 सप्टेंबर 2018

दोन्ही वाहिन्या आयपीएलच्या धर्तीवर कुस्तीच्या लीग स्पर्धा भरविणार आहे. यात आठ फ्रँचाईझी आहेत. यापैकी कुठल्या वाहिनीची स्पर्धा अगोदर घ्यायची यावरुन दोन्ही वाहिन्यांमध्ये वाद सुरु होते. या दोन्ही वाहिन्यांनी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना साकडे घातले.

पुणे - कुस्ती स्पर्धा भरविण्यावरुन दोन मराठी वाहिन्यांमध्ये सुरु असलेल्या वादावर शरद पवार यांनी मध्यस्थी केली आहे. या दोन्ही वाहिन्यांनी कुस्तीगीर परिषदेकडे स्पर्धेबाबतचे प्रस्ताव पाठवले होते. या दोन्ही वाहिन्यांमधील वाद सोडविण्यासाठी पवार यांनी आज पुण्यात कुस्तीगीर परिषदेची बैठक बोलावली होती.

या दोन्ही वाहिन्या आयपीएलच्या धर्तीवर कुस्तीच्या लीग स्पर्धा भरविणार आहे. यात आठ फ्रँचाईझी आहेत. यापैकी कुठल्या वाहिनीची स्पर्धा अगोदर घ्यायची यावरुन दोन्ही वाहिन्यांमध्ये वाद सुरु होते. या दोन्ही वाहिन्यांनी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना साकडे घातले. त्यावर निर्णय घेण्यासाठी आज कुस्तीगीर परिषदेच्या कार्यकारिणीची बैठक बोलावण्यात आली होती. याच बैठकीत हिंदकेसरी कै. गणपतराव आंदळकर यांना श्रद्धांजली वाहण्याचा विषयही विषयपत्रिकेवर होता. दोन्ही वाहिन्यांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.

या विषयावर कार्यकारिणीशी बोलून निर्णय घेण्यात येईल, असे पवार यांनी दोन्ही वाहिन्यांना सांगितले होते. या विषयावर निर्णय घेण्यासाठी सात सदस्यांची समिती नेमण्यात येईल ही समिती जो निर्णय घेईल तो अंतीम असेल असे पवार यांनी या बैठकीत सांगितले. हा तोडगा मान्य करण्यात आला. ही समिती उद्या (बुधवार ता. 26) सायंकाळी पुन्हा एकत्र येऊन या विषयावर निर्णय घेणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.  

संबंधित लेख