Sharad Pawar likes wrestling of Yashwant Satara team | Sarkarnama

शरद पवार यांनी केले 'यशवंत सातारा'च्या कुस्तीगीरांचे कौतुक

उमेश बांबरे
गुरुवार, 8 नोव्हेंबर 2018

शरद पवार यांना यशवंत सातारा टीममधील १९ वर्षीय आदर्श गुंडचा खेळ विशेष आवडला.

सातारा : महाराष्ट्र कुस्ती दंगल स्पर्धेत यशवंत सातारा या  पुरुषोत्तम जाधव यांच्या टीमचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष  शरद पवार यांनी कौतुक केले. तसेच ते स्वतः दोन दिवस या टीमचा सामना पाहण्यासाठी उपस्थित राहिले.

विशेष म्हणजे पुरुषोत्तम जाधव भाजपचे सातारा लोकसभेसाठी  इच्छुक उमेदवार  आहेत . पण शरद पवार यांनी आपण खेळात राजकारण आणत नाही हे यानिमित्ताने पुन्हा एकदा दाखवून दिले . 

महाराष्ट्र कुस्ती दंगल स्पर्धेत साताऱ्याच्या टीमची मालकी भाजपचे सातारा लोकसभेसाठी इच्छुक उमेदवार पुरुषोत्तम जाधव यांनी घेतली आहे. या टीमचा पहिला व दुसरा सामना २ आणि ३ नोव्हेंबरला  पुण्यात झाला. ही स्पर्धा पाहण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार स्वतः उपस्थित राहिले होते. या टीममध्ये सातारा आणि बारामती मधील मल्लांचा समावेश होता. पहिला व दुसरा सामना यशवंत सातारा टीम मधील मल्लाने जिंकला. 'यशवंत सातारा' टीमची कामगिरी पाहून शरद पवार यांनी  खेळाडूंचे कौतुक केले. 

ते  स्वतः पहिले दोन दिवस या टीमचा सामना पाहण्यासाठी उपस्थित होते. शरद पवार यांचे कुस्तीवर असलेले प्रेम हे सर्वज्ञात आहे .त्यांच्या प्रयत्नामुळे कुस्ती आज महाराष्ट्रात नव्याने पुन्हा पाय रोवत आहे.  दुसऱ्या दिवशी सामना पाहण्यासाठी येताना श्री. पवार यांनी रोहित पवारांनाही सोबत आणले होते. श्री. पवार यांना यशवंत सातारा टीममधील १९ वर्षीय आदर्श गुंडचा खेळ विशेष आवडला. श्री.पवार  यांनी  टीमचे आयोजक पुरुषोत्तम जाधव यांचेही अभिनंदन केले.

कुस्ती सुरू असताना वाघ आला रे वाघ आला साताऱ्याचा वाघ आला,अश्या घोषणा उपस्थित प्रेक्षक देत होते. या वेळी शरद पवार यांनी पुरुषोत्तम जाधव यांचे  चांगली टीम निवडल्याबद्दल कौतुक केले. तसेच घोषणा ऐकून तुम्ही निवडणुकीची तयारी सुरू केली आहे का?  असेही श्री. पवार यांनी विचारले.  

संबंधित लेख