छगन भुजबळांचे बरेवाईट झाल्यास मुख्यमंत्री फडणवीस तुम्हीच जबाबदार, शरद पवारांनी लिहिले पत्र 

छगन भुजबळांचे बरेवाईट झाल्यास मुख्यमंत्री फडणवीस तुम्हीच जबाबदार, शरद पवारांनी लिहिले पत्र 

मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळांचे काही बरवाईट झाल्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तुम्हीच जबाबदार असाल असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. 

भुजबळ यांच्या प्रकृती विषयी चिंता व्यक्त करतानाच त्यांना योग्य उपचार देण्यात यावेत अशी मागणीही शरद पवार यांनी केली आहे. 

भुजबळ गेल्या दोन वर्षांपासून आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी पोलीस कोठडीत आहेत. भुजबळ यांच्या शारिरीक स्वास्थावरही परिणाम झाला आहे.या वयात त्यांना तुरुंगात राहण्याची वेळ आलेल्या भुजबळ यांना योग्य वैद्यकीय उपचार मिळावेत, अशी मागणी पवार यांनी फडणवीस यांच्याकडे केली आहे. भुजबळांना योग्य वैद्यकीय उपचार न मिळाल्याने प्रकृतीला धोका निर्माण झाला तर याची संपूर्ण जबाबदारी ही सरकारची असेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. 

गेल्या काही दिवसांपासून भुजबळ यांच्या ढासळत जाणाऱ्या प्रकृतीविषयी मला अतिशय चिंता वाटत आहे. त्यांचं वय 71 वर्ष असून ते 14 मार्च 2016 पासून तुरुंगात आहे. त्यांची प्रकृती अतिशय कमकुवत झाली आहे. 

हे कायदेशीर प्रकरण आहे. न्यायालयानेही त्यांच्याविषयी अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. जोपर्यंत न्यायालय अंतिम निर्णय देत नाही, तोपर्यंत भुजबळांना निर्दोष मानलं जाईल. जामीन हा नियम आहे, तुरुंग हा अपवाद आहे. हाच नियम भुजबळ यांनाही लागू होतो. पण दुर्दैवाने भुजबळांना वारंवार जामीन नाकारण्यात आला आहे. तरीही मला या विषयावर भाष्य करायचं नाही. 

भुजबळ हे ओबीसी नेते असून 50वर्षे सार्वजनिक जीवनासाठी खर्च केली आहेत. मुंबईचे महापौर, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, गृहमंत्री, सार्वजनिक बांधकाम, पर्यटन मंत्री अशा जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडल्या आहेत. शिवाय महाराष्ट्राच्या जनतेच्या कल्याणासाठी त्यांचं योगदान विसरता येणार नाही. 

माझी फार अपेक्षा नाही. पण, भुजबळांना योग्य वैद्यकीय उपचार मिळायला हवेत. तो त्यांचा घटनात्मक अधिकारही आहे. छगन भुजबळ यांची प्रकृती आणि वाढतं वय पाहता, आवश्‍यक ती पावलं उचलून त्यांना योग्य वैद्यकीय सेवा पुरवल्या जातील, याची मला खात्री आहे. 

मला हे लिहिताना दु:ख होतं आहे, पण तरीही जर येत्या काही दिवसात योग्य उपचारांअभावी भुजबळांची प्रकृती खालावली, तर त्यासाठी तुमचं सरकार जबाबदार असेल. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com