शरद पवार मिश्किलपणे म्हणाले, म्हणजे अजूनही दुःख आहे का...आणि सभागृहात हशा उसळला !

sharad-Pawar-1
sharad-Pawar-1

बारामती : शरद पवार यांनी बारामती येथे एका कार्यक्रमात एका ज्येष्ठ  कवियत्रीच्या कवितांचे असे काही रसग्रहण केले की सभागृहात वारंवार हशा उसळला . कवितेतील एक - एक ओळीचे वाचन करीत त्यांनी त्यावर मिश्किलपणे  केलेल्या कॉमेंट्सनी सभागृहात हास्यरसाचा धबधबा ओसंडून वाहू लागला . 

बारामती ज्येष्ठ नागरिक निवासामध्ये सिध्दशिला ग्रुपचे प्रितम राठोड व रवी जैन यांनी उभारलेल्या एक कोटी रुपयांच्या सोळा बंगल्यांच्या वृंदावन संकुलाचे  उदघाटन मंगळवारी  शरद पवार यांच्या हस्ते झाले, त्या प्रसंगी ते बोलत होते. विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुण गुजराथी, खासदार सुप्रिया सुळे व अन्य मान्यवर हजर होते . 

कार्यक्रमा दरम्यान एका कवियत्रीने   पवारांना एक काव्यसंग्रह भेट म्हणून दिला .  इतर मान्यवरांची भाषणे सुरु असताना शरद पवार यांनी त्यातील काही कविता वाचल्या . मग स्वतः भाषणाला उभे राहिल्यावर त्या कविता संग्रहातील एका  कवितेचे जाहीर वाचन करताना असे काही रसग्रहण केलं की उपस्थित अक्षरशः हास्यकल्लोळात बुडाले !

शरद पवार  तेथे उपस्थित असलेल्या संबंधित कवियत्रीस  म्हणाले , तुमचे वय सांगायला अडचण नसेल, तर सांगा.

 त्यावर  कवियत्री म्हणाल्या  वय 75 वर्षे आहे .

त्यावर हसत हसत  पवार म्हणाले ,मग, आता वय लपवायची काही गरज नाही ! ( हशा...)

पंचाहत्तराव्या वर्षी त्यांनी कविता लिहीली...उद्देशून कोणाला? तर प्रियकराला!  (पुन्हा हशा ) 

मग पवारांनी या कवयित्रींची  कविताच वाचून दाखविली.
शेवटच्या ओळी होत्या.....जिवापाड प्रेम करुनही तुला अजूनही आपले बनवू शकले नाही !

त्यावर पवार मिश्कीलपणे  म्हणाले,  म्हणजे अजून दुःख आहे काय? (पुन्हा हशा) 

कधीतरी तू घालशील मला साद...मीही आनंदाने देईन तुला प्रतिसाद !
थोडा पॉज घेऊन पवार म्हणाले, वय वर्षे पंच्याहत्तर !  (प्रचंड हशा) 
त्यानंतर  पवार षटकार मारत म्हणाले , इथे असलेल्या सर्व ज्येष्ठांना मी सांगतो की काही काळजी करु नका आपणही तरुण आहोत ! कोणीही येथे वृध्द नाही! (प्रचंड हशा) 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com