sharad pawar dinner at mahadik house | Sarkarnama

पवारांनी मुश्रीफांच्या दंडाला धरत त्यांच्या प्रतिक्रियेला दाद दिली!

  सदानंद पाटील 
शनिवार, 1 डिसेंबर 2018

पवार साहेबांच्या मनात नेमकं काय चाललं आहे, याचा नेमच लागत नसल्याचे उदगार राष्ट्रवादीच्या एका नेत्याने काढले. 

कोल्हापूर : संसदीय उपनेते म्हणून निवड केलेल्या खासदार धनंजय महाडिक यांच्या घरी भोजन करुन राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारल्या. महाडिक यांना संसदीय उपनेतेपदी नेमून पवार यांनी महाडिक यांच्या मागे आपला वरदहस्त असल्याचे दाखवून दिले. मात्र जेवणानंतर बाहेर पडताना पवार यांनी आमदार हसन मुश्रीफांना सोबत घेतले.

ते पाहून, पवार साहेबांच्या मनात नेमकं काय चाललं आहे, याचा नेमच लागत नसल्याचे उदगार राष्ट्रवादीच्या एका नेत्याने काढले. 

आंबोली येथे 2 डिसेंबरला होणाऱ्या कार्यक्रमासाठी पवार हे कोल्हापुरात आले आहेत. दुपारच्या जेवणाचे नियोजन महाडिक यांच्या घरी असल्याने पवार हे थेट त्यांच्या घरी दाखल झाले. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, उद्योगपती व्ही. बी. पाटील, आर. के. पोवार उपस्थित होते. दरम्यान या ठिकाणी आमदार हसन मुश्रीफ यांचे आगमन झाले. 

आमदार मुश्रीफ व खासदार महाडिक यांच्यात मोठा दुरावा निर्माण झाला आहे. आमदार मुश्रीफ यांना  पवार व महाडिक यांनी जेवणासाठी विचारणा केली असता, आपण डाएटवर असल्याचे त्यांनी सांगितले. 

खासदार महाडिक यांच्या घरी यावेळी साखर उद्योग, शेतीचे प्रश्‍न आदी विषयावर चर्चा झाली. केंद्र शासनाचे धोरण, उसाला पर्यायी पिक पध्दती या विषयावर नेत्यांनी चर्चा केली. यानंतर खा. महाडिक यांच्या घरातून निघताना मात्र खा. पवार यांनी आमदार हसन मुश्रीफ यांना सोबत घेतले.  

खा. महाडिक यांना संसदीय उपनेते केल्याबददल आणि हा सन्मान कोल्हापुरला दिल्याबददल खा. पवारांचे उपस्थितांनी स्वागत केले. यावर हा मान खासदार सदाशिवराव मंडलिक यांनाही यापूर्वी मिळाल्याचा टोला आमदार हसन मुश्रीफ यांनी लावला. 

चौकट नको म्हणून आलो 
खासदार महाडिक यांच्या घरी जिल्हा राष्ट्रवादीचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. मात्र आमदार हसन मुश्रीफ उपस्थित नव्हते. तेवढयात काही वेळाने मुश्रीफांचे आगमन झाले.  मुश्रीफांना त्यांच्या आगमनाबाबत विचारले असता, उद्याच्या अंकात चौकट येवू नये म्हणून आलो असल्याचे सांगताच एकच हशा पिकला. खासदार पवार यांनी तर मुश्रीफांच्या दंडाला धरत त्यांच्या या प्रतिक्रियेला दाद दिली.

संबंधित लेख