शरद पवार यांनी फडणविसांसोबतचे व्यासपीठ टाळले!

शरद पवार यांनी फडणविसांसोबतचे व्यासपीठ टाळले!

भाजपनेही हा कार्यक्रम एक इव्हेंट म्हणून साजरा केल्याचे उघड झाले आहे.या एकाच कार्यक्रमाच्या दोन निमंत्रण पत्रिका छापण्यात आल्या. महापालिकेच्या पत्रिकेवर पदाधिकाऱ्यांसह विरोधकांच्या नावांचा उल्लेख होता. तर दुसऱ्या पत्रिकेवर मात्र आपल्याच पक्षाच्या काही नेत्यांची नावे होती. त्यामुळे राष्ट्रवादीची स्थानिक मंडळी नाराज होती.

पुणे : पुणे महापालिकेच्या विस्तारीत इमारतीच्या उदघाटन समारंभाला राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उपस्थित राहणे टाळले. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.

या इमारतीचे भूमिपूजन पवार यांच्या हस्ते झाले होते. त्यामुळे तिच्या उदघाटन समारंभाला  उपस्थित राहतो, असे स्वतः पवार यांनी कळविले होते. तरी ते न आल्याने वेगळीच राजकीय चर्चा सुरू झाली. 

शरद पवार यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. पुण्यातच राष्ट्रवादीच्या हल्ला बोल आंदोलनाचा समारोप झाला. त्याला दहा दिवस पूर्ण होताच पु्न्हा भाजपच्या नेत्यांच्या मांडीला मांडी लावून बसणे, सध्या राष्ट्रवादीने टाळले आहे.

शरद पवार हे सध्या मोदींवर ते शेलक्या शब्दांत टीका करत आहेत. अशा स्थितीत फडणवीस यांच्या सोबत व्यासपीठावर जाणे याचे पुन्हा वेगळे संदेश जाऊ शकतात, असा पक्षातील काहींचा सूर होता. निवडणुका जवळ आल्या आहेत. अशा स्थितीत व्यासपीठावरील संकेत म्हणून भाजपच्या नेत्यांनी पवार यांच्याबद्दल आणि पवार यांनी पुन्हा भाजपच्या नेत्यांबद्दल गोडगोड बोलले गेले असते. ते टाळण्यासाठीच पवार यांनी त्याकडे न फिरकण्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले.  

याशिवाय भाजपनेही हा कार्यक्रम एक इव्हेंट म्हणून साजरा केल्याचे उघड झाले आहे.या एकाच कार्यक्रमाच्या दोन निमंत्रण पत्रिका छापण्यात आल्या. महापालिकेच्या पत्रिकेवर पदाधिकाऱ्यांसह विरोधकांच्या नावांचा उल्लेख होता. तर दुसऱ्या पत्रिकेवर मात्र आपल्याच पक्षाच्या काही नेत्यांची नावे होती. तेथे विरोधकांना स्थान दिले गेले नाही. राष्ट्रपतींच्या कार्यक्रमात राजशिष्टाचाराचा भंग होऊनही महापालिका अर्थात भाजप नेत्यांनी धडा घेतला नसल्याचे दिसून आले. भाजपा उपराष्ट्रपतींचा कार्यक्रमदेखील राजकीय हेतूने करीत असून, पुणेकरांना दिलेल्या पत्रिकेत मात्र विरोधकांना डावलल्याचा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसने केला.

या संदर्भात बोलताना महापालिकेतील विरोधी पक्षनेते चेतन तुपे म्हणाले, "" महापालिकेच्या कार्यक्रमातही भाजपा राजकारण करीत आहे. उपराष्ट्रपतींचा कार्यक्रम असल्याने काही संकेत पाळणे अपेक्षित होते. मात्र, भाजपने त्याकडे पूर्णत: दुर्लक्ष केले. विरोधकांना गृहीत धरले जात नाही. महापालिकेचे कार्यक्रमदेखील सत्ताधारी भाजपा मिरविण्यासाठी करतात.''

भाजपच्या या वृत्तीबद्दल पुणे महापालिकेसमोर आंदोलन केल्याच्या आरोपावरून राष्ट्रवादीच्या नगरसेवकांसह २५ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. शिवाजीनगर मुख्यालयात त्यांची रवानगी करण्यात आली. राष्ठ्रवादी काॅंग्रेसचे नेते अजित पवार यांनीही या कार्यक्रमाकडे पाठ फिरवत आज सकाळीच साडे आठ वाजता येऊन इमारतीची पाहणी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com