Sharad Pawar & Ashok Chavan applaud Dhanajay Munde | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

नगरमध्ये डॉ. सुजय विखे जिंकले
रायगडात सुनील तटकरे जिंकले

 शरद पवार -अशोक चव्हाणांनी थोपटली धनंजय मुंडेंची पाठ 

दत्ता देशमुख 
रविवार, 24 फेब्रुवारी 2019

राष्ट्रवादी काँग्रेसचे  अध्यक्ष शरद पवार , प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी धनंजय मुंडे यांच्या संघटन कौशल्याचे आणि नेतृत्वगुणांचे कौतुक केले.  दहा वर्षांपूर्वी गोपीनाथ मुंडे  यांचे पुतणे एवढीच त्यांची राज्याला ओळख होती.आता मात्र ते राष्ट्रवादी काँग्रेसचे स्टार कॅम्पेनर म्हणून उदयास आले आहेत . 

बीड : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार , प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी धनंजय मुंडे यांच्या संघटन कौशल्याचे आणि नेतृत्वगुणांचे कौतुक केले.  दहा वर्षांपूर्वी गोपीनाथ मुंडे  यांचे पुतणे एवढीच त्यांची राज्याला ओळख होती. आता मात्र ते राष्ट्रवादी काँग्रेसचे स्टार कॅम्पेनर म्हणून उदयास आले आहेत .  

गेल्या दहा वर्षात धनंजय मुंडेंनी गोपीनाथ मुंडे यांच्यातील नेतृत्वगुण आत्मसात केले. आपल्या वक्तृत्व  कौशल्याला धार दिली .  राष्टवादी कॉग्रेस पक्षात संपूर्णपणे मिसळले . पक्षनेतृत्वाचा विश्वास संपादन करीत विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते पद मिळवले . पक्षाने दिलेल्या बळावर आता धनंजय मुंडेंचे नेतृत्व प्रस्थापित बनले आहे . 

बीड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे नेत्यांची कमी नाही . पण पक्षाशी एकनिष्ठ राहून आपल्या राजकीय स्वार्थासाठी भाजपशी हातमिळवणी न करणाऱ्या मोजक्या नेत्यांत त्यांचा समावेश होतो . त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने बीड जिल्ह्यातील  जुन्या , अनुभवी आणि मातब्बर नेत्यांना मार्गदर्शकांची  भूमिका दिली आणि धनंजय मुंडे आणि त्यांच्या तरुण सहकाऱ्यांकडे जिल्ह्याची धुरा दिली आहे . 

परळी येथे काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडी संयुक्त सभेचे संपूर्ण नियोजन धनंजय मुंडेंचे होते . त्यांनी सभेला गर्दीही चांगली जमवली होती .  राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्धार परिवर्तन यात्रेचा समारोप आणि महाआघाडीची दुसरी संयुक्त सभा परळीत झाली. वास्तविक जानेवारी महिन्यात निर्धार परिवर्तन यात्रा जिल्ह्यात होणार होती.

मात्र, धनंजय मुंडे यांच्या पुढाकाराने आणि आग्रहाने यात्रेचा समारोप जिल्ह्यात करण्याचे निश्चित झाले. मुंडेंच्या परळी होमपिचवर समारोप असल्याने धनंजय मुंडे पंधरा दिवसांपासून तयारी करत होते. शेवटच्या टप्प्यात महाआघाडीची संयुक्त सभा ठरल्याने राष्ट्रवादीबरोबरच काँग्रेससह घटक पक्षांचे नेतेही येणार असल्याने मग तयारीत आणखीच भर टाकावी लागली.

स्थानिक नेत्यांसह जोगेंद्र कवाडे, जयंत पाटील यांनी  धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वगुणांचे  आणि संघटन कौशल्याचे कौतुक केले .  शरद पवार यांनी धनंजय मुंडे यांना ‘लढाऊ योद्धा’ असे म्हंटले तर  अशोक चव्हाण यांनी त्यांना  ’सिंघम’ अशी पदवी प्रदान केली .

शरद पवारांनी भाषणात बीड जिल्ह्यात  जिल्ह्यात ही सर्वात मोठी सभा झाली  अशी शाबासकी धनंजय मुंडेंना देऊन टाकली.  शरद पवारांनी धनंजय मुंडेंचे  ‘सर्वसामान्यांचे नेते आणि लढाऊ योद्धा’ अशा शब्दात वर्णन केले .  आता लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसला विजय मिळवून देण्यासाठी धनंजय मुंडे यांना आकाशपाताळ एक करावे लागणार आहे . जिल्ह्यातील अन्य नेत्यांचे सहकार्य ते कसे मिळवतात यावर बरेच काही अवलंबून राहील . 

 

संबंधित लेख