Sharad Pawar appreciates governments decision to waive loan of farmers | Sarkarnama

शेतकऱ्यांच्या 'सरसकट' कर्जमाफीचे स्वागत करतो : शरद पवार

सरकारनामा ब्युरो
रविवार, 11 जून 2017

राज्यातील शेतकऱ्यांचे "सरसकट' कर्जमाफ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे, त्याचे मी स्वागत करतो. या निर्णयाने राज्यात नव्या आर्थिक स्वातंत्र्याची पहाट होणार आहे. तत्त्वत:, सरसकट आणि निकष याच्या व्याख्येत मी अधिक जात नाही. सरसकट म्हणजे सगळ्यांना हा अर्थ मला माझ्या गुरुजींनी शिकवला आहे. त्यामुळे सरकारने आता महसूल व सहकार विभागाला तातडीने आदेश देऊन शेतकऱ्यांचे सातबारे कोरे करावे, अशा सूचना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी दिल्या आहेत.

औरंगाबाद : राज्यातील शेतकऱ्यांचे "सरसकट' कर्जमाफ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे, त्याचे मी स्वागत करतो. या निर्णयाने राज्यात नव्या आर्थिक स्वातंत्र्याची पहाट होणार आहे. तत्त्वत:, सरसकट आणि निकष याच्या व्याख्येत मी अधिक जात नाही. सरसकट म्हणजे सगळ्यांना हा अर्थ मला माझ्या गुरुजींनी शिकवला हे. त्यामुळे सरकारने आता महसूल व सहकार विभागाला तातडीने आदेश देऊन शेतकऱ्यांचे सातबारे कोरे करावे, अशा सूचना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी दिल्या आहेत.

राज्य सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीच्या निर्णयानंतर शरद पवार यांनी रविवारी (ता. 11) औरंगाबादेत तातडीची पत्रकार परिषद बोलावून आपली सविस्तर भूमिका मांडली. ते म्हणाले, शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात इतिहासात यापुर्वी इतकी अस्वस्थता कधीही नव्हती. राजकीय मतभेद बाजूला सारून सगळे शेतकरी व संघटना या मुद्यावर एकत्रित आल्या. सुकाणू समिती आणि राज्य सरकारने नियुक्त केलेल्या समितीमध्ये झालेली चर्चा आशादायक व यशस्वी झाली. त्याबद्दल मी त्यांचे व शेतकऱ्यांच्या भावना सरकारने लक्षात घेतल्या त्यामुळे सरकारचेही अभिनंदन करतो. आता घेतलेल्या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करण्याची वेळ आली आहे. खरीप हंगाम तोंडावर असतांना अद्याप फक्त 27 टक्के शेतकऱ्यांनाच कर्जपुरवठा करण्यात आला आहे. कर्जमाफीच्या निर्णयाने आता शंभर टक्के शेतकऱ्यांना कर्ज मिळेल. माझे शेतकऱ्यांना व शेतकीरी संघटनाना आवाहन आहे, की त्यांनी उद्यापासूनच सहकारी सोसायट्या, बॅंकामध्ये जाऊन कर्ज पदरात पाडून घ्यावे.

तत्वत: व निकष याची काळजी वाटते
कर्जमाफी देताना सरकारने तत्वत: व निकष हे शब्द वापरल्याने मला काळजी वाटते. सरसकट हाच निकष सरकारने लावावा अशी मागणी शरद पवारांनी यावेळी केली. राज्य सरकार केंद्राकडे स्वामिनाथन समितीच्या शिफारशीवर चर्चा करण्यासाठी जाणार असल्याचे कळाले. तेव्हा उत्पादन खर्च अधिक पन्नास टक्के लाभाचा निर्णय पदरात पाडून घ्यावा अशी सूचना त्यांनी केली.

चंद्रकांत पाटलांच्या शब्दावर माझा विश्‍वास
महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या शब्दावर माझा विश्‍वास आहे. सहकार खाते त्यांच्याचकडे असल्याने ते तातडीने संबंधित यंत्रणेला आदेश देऊन निर्णयाची अंमलबाजावणी करायला लावतील. सातबारा कोरा होण्याइतका दुसरा आनंद शेतकऱ्यांसाठी कुठला असू शकतो, अशा शब्दांत पवारांनी चंद्रकांत पाटलांना टोला लगावला. 30 हजार 500 कोटी रुपयांच्या कर्जमाफीचा निर्णय सरकारने तरतूद केल्याशिवाय घेतला नाही. आमच्या काळात आम्ही कर्जमाफी दिली तेव्हा आधी तरतूद केली होती. आताही मुख्यमंत्र्यांनी "मम' म्हटल्या शिवाय हा निर्णय झालेला नाही, असा चिमटा शरद पवारांनी काढला.

समृध्दीला विरोध नाही, म्हणणे ऐकण्यासाठी आलो
समृध्दी महामार्गाला विरोध करण्यासाठी नाही, तर मला भेटलेल्या शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकण्यासाठी मी आलो आहे. विकास आवश्‍य करा पण शेतकरी उध्दवस्त होणार नाही याची देखील काळजी घ्यावी लागेल. सरकार आणि शेतकऱ्यांमध्ये मी समन्वयाची भूमिका पार पाडणार आहे. त्यानंतर शेतकऱ्यांना विचारूनच पुढची दिशा ठरवली जाईल असे शरद पवार यांनी स्पष्ट केले.

संबंधित लेख