शाहू - फुले - आंबेडकर यांना आदर्श मानत असल्याने फुले पगडी वापरण्याची सूचना - शरद पवार

शाहू - फुले - आंबेडकर यांना आदर्श मानत असल्याने फुले पगडी वापरण्याची सूचना - शरद पवार

पुणे : ""मी शाहू-फुले-आंबेडकर यांना आदर्श मानतो. तेव्हा, महात्मा फुलेंची पगडी वापरण्याची सूचना केली. पण, त्यामागे कोणताही वैयक्तिक हेतू नसल्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी स्पष्ट केले. ज्यांना आदर्श मानतो त्यांच्याकडून काही तरी शिकायला हवेच. त्यातून पगडीचा विषय मांडला. मी पुण्यात शिकलो आणि वाढलोही त्याचा अभिमान आहे, असेही पवार यांनी सांगितले. 

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या हल्लोबोल आंदोलनाच्या पुण्यातील सांगता सभेत "पुणेरी'ऐवजी "फुले पगडी'चा वापर करण्याची सूचना पवार यांनी पक्षाचे पदाधिकारी-कार्यकर्त्यांना केली होती. पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचा फुले पगडी घालून सत्कार करीत, यापुढे हीच पगडी वापरण्याचे आवाहनही त्यांनी केले होते. या कार्यक्रमातील पवारांच्या सूचनेची गेली काही दिवस सर्वत्र चर्चा सुरू आहे. 

या पार्श्‍वभूमीवर सहकारनगरमध्ये झालेल्या कार्यक्रमात पवार यांनी "पगडी' मागील आपली भूमिका जाहीर केली. महापालिकेच्या वतीने उभारण्यात आलेल्या डॉ. कदम डायग्नोस्टिक सेंटरचे उदघाटन त्यांच्या हस्ते झाले. तेव्हा, त्यांनी आपली भूमिका मांडली. महापौर मुक्ता टिळक, ज्येष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव, विरोधीपक्षनेते चेतन तुपे, नगरसेविका आश्‍विनी कदम आदी उपस्थित होते. 

पवार म्हणाले, ""मी मध्यंतरी पगडीचा विषय मांडला. त्यावरून बरीच चर्चा झाली. प्रत्येकजण कोणाला तरी आदर्श मानतो. त्यानुसार मी छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदर्श मानतो. त्यातील छत्रपतींची पगडी सर्वसामान्यांना मिळत नाही. डॉ. आंबेडकर डोक्‍यावर काही घालत नव्हते. त्यामुळे फुले यांची पगडी वापरण्याचा विचार मांडला. समता, परिवर्तन, विज्ञानाचा पुरस्कार करणाऱ्या फुले यांचा विचार पुढे नेणे ही सामाजिक आणि राष्ट्रीय गरज आहे. या प्रक्रियेत मी आहे. मात्र, त्याबाबत वैयक्तिक किंवा ठराविक वर्गाच्या विरोधात भूमिका घेतल्याचे मानणे चुकीचे आहे. ते योग्य नाही. '' 

ते म्हणाले, ""कर्तृत्त्व गाजविण्याचा मक्ता केवळ पुरुषांकडे नाही. मुली आणि महिलांना योग्य संधी दिल्यास त्या भरीव कामगिरी करू शकतात, जिचा समाजातील वंचित घटकांनाही लाभ होतो. न्यू इंग्लिश स्कूलमध्ये मुलींना 80 वर्षांनी का होईना पण, प्रवेश मिळाला. याचा अर्थ पुणे शहर बदलले आहे. मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचा महात्मा फुलेंचा दृष्टीकोन होता. '' दरम्यान, डॉ. आढाव यांनी आपल्या भाषणात फुले पगडीचा उल्लेख केला. त्यानंतर स्थानिक कार्यकर्त्यांनी पवार यांचा फुले पगडी देऊन सत्कार केला. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com