sharad pawar and mundada | Sarkarnama

चर्चा शरद पवार आणि अक्षय मुंदडा भेटीचीच

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 3 मार्च 2018

बीड : राष्ट्रवादी पक्षातल्या एका गटाकडून दूर ढकलण्याचे प्रयत्न होत असल्याने नंदकिशोर मुंदडा व अक्षय मुंदडा या पितापुत्रांनी आपल्या खांद्यावरचा पक्षाचा झेंडा थोडासा बाजूला ठेवत विमलताई मुंदडा विचार मंच व अक्षय मुंदडा मित्रमंडळाच्या माध्यमातून सामाजिक कामाच्या निमित्ताने आपला जनसंपर्क कायम ठेवला आहे. मात्र, शरद पवारांवरची त्यांची निष्ठा आणि पवारांचे अक्षय मुंदडा यांच्यावरील प्रेम कायम आहे. त्याचाच प्रत्यय शनिवारी रांजणी (जि. कळंब) येथील पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात आला. 

पवार जिल्ह्याच्या सीमेवर येत असल्याने अक्षय मुंदडा यांनीही कार्यकर्त्यांसह कार्यक्रमाला हजेरी लावली. पवारांचे हेलिकॉप्टर लॅंड होणाऱ्या हेलिपॅडवरच श्री. मुंदडा थांबून होते. इथे आल्यापासून ते मुख्य कार्यक्रमाकडे जाताना दोघांमध्ये बोलणे होत असल्याचे आणि कार्यकर्त्यांची ओळख करुन देतानाचे विविधांगी फोटो मुंदडा समर्थकांनी सोशल मिडीयावर पोस्ट केले आहेत. त्यामुळे पवारांनी मुंदडांना काय सल्ला दिला असेल अशा चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरु झाल्या आहेत. सहाजिकच या भेटीतील बोलण्यात राजकीय संदर्भ नसला तरी अक्षय मुंदडांनी पवारांची घेतलेली भेट आणि पवारांनीही त्यांना वेळ देऊन केलेली विचारपूस पाहता दोघांमधील नाते अद्यापही घट्ट असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

दरम्यान, दिवंगत नेत्या डॉ. विमल मुंदडा यांनी केज मतदार संघाचे सलग पाच वेळा प्रतिनिधीत्व केले. तसेच, प्रत्येक वेळी त्यांच्या विजयी मतांचा आलेख चढत्या क्रमाचा राहीलेला आहे. राष्ट्रवादी स्थापनेच्या पुर्वीपासून पवारांसोबत असलेल्या दिवंगत विमल मुंदडा पवारांच्या विश्वासातील मानल्या जात. अक्षय मुंदडाबद्दल असलेला पवारांचा जिव्हाळाही अनेकवेळा दिसलेला आहे. मोजक्‍याच नेत्यांच्या घरी जाणारे पवार अक्षय मुंदडांच्या "आई' निवासस्थानी आल्यानंतर "माझा विठ्ठल माझ्या घरी आला' असे दोन वर्षांपूर्वी अक्षय मुंदडा म्हणाले होते. सुप्रिया सुळेंनीही अक्षय मुंदडांकडे एक वर्षापूर्वी पाहुणचार घेतला होता. मात्र, मागच्या वर्षभरात पक्षातील गटबाजीतून मुंदडांना टार्गेट करण्याचे प्रयत्न होत असल्याचा मुंदडा समर्थकांचा आरोप आहे. त्यामुळे मुंदडांनीही खांद्यावरील पक्षाचा झेंडा बाजूला ठेवला आहे. मात्र, "पवारच आमचे दैवत' असल्याचे ते जाहीर सांगत असतात. त्यातच दोन महिन्यांपूर्वी सुप्रिया सुळे व अक्षय मुंदडा यांच्यातील संवादाचे तर आता शरद पवारांसोबतच्या संवादाचे फोटो व्हायरल होत आहेत. त्यामुळे या दोघांनी मुंदडांना काय, सल्ला दिला अशी चर्चा आहे. 

संबंधित लेख