मनसे आमदार सोनवणे म्हणतात मी पवारांचा चेला पण; पवारांनी घेतली फिरकी

sharad pawar sharad sonwane
sharad pawar sharad sonwane

आळेफाटा : जुन्नरचे मनसेचे आमदार शरद सोनवणे यांची फिरकी खुद्द शरद पवार यांनी आज घेतली. श्री. पवार हे जुन्नर तालुक्यात दौऱ्यावर आलेले असताना एका कार्यक्रमात बोलताना सोनवणे यांनी आपण शरद पवार यांचे चेले असल्याचे सांगितले. यावर पवार यांनी त्यांची फिरकी घेतली.

"महिनाभरापूर्वी शिवसेनेचे नेते आणि  संजय राऊत जुन्नरला आले होते. त्या वेळी सोनवणे यांनी मी त्यांचा चेला असल्याचे सांगितले होते. त्यामुळे आता मला माझीच काळजी वाटायला लागली आहे,'' अशी गुगली पवार यांनी टाकताच सभेत एकच हशा उडाला.

राजुरी येथे गणेश सहकारी दूध व्यावसायिक संस्थेच्या राजुरी दूध प्रकल्पाच्या नूतन इमारतीचे उद्‌घाटन, शरदचंद्र नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने देण्यात येणारा शरदचंद्र गौरव पुरस्काराचे वितरण, रौप्यमहोत्सव सांगता सोहळा व स्मरणिका प्रकाशन शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच, राजुरी विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचा शतकपूर्ती महोत्सव सोहळा व शेतकरी मेळावा या निमित्त झाला. आमदार शरद सोनवणे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वास देवकाते, उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, अतुल बेनके, विष्णुकाका हिंगे आदी या प्रसंगी उपस्थित होते.

आमदार सोनवणे हे व्यासपीठ गाजविण्यात पटाईत आहेत. शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त झालेल्या कार्यक्रमात सोनवणे यांनी आढळराव हे मार्गदर्शक असल्याचे सांगत त्यांनी आपल्या भावी राजकीय वाटचालीसाठी मार्गदर्शन करावे, असे आवाहन केले होते. सेना नेते राऊत यांचे आपण चेले असल्याचे सांगितले. शिवसेना नेत्यांशी सलगी वाढवत असतानाच आपण आगामी निवडणुकीत मनसेचे उमेदवार असल्याचे त्यांनी स्पष्टीकरण दिले होते. त्यात आज आपण शरद पवार यांचे चेले असल्याचे सांगत आणखी एका नव्या चर्चेला सुरवात केली.

या प्रसंगी बोलताना शरद पवार म्हणाले की धनवानांना सवलत देणार आणि दोन वेळच्या पोटाचा प्रश्न सोडवितो त्याला उपाशी ठेवणार, हे सहन करणार नाही. 
खाणाऱ्यांच्या हिताची जपणूक करायला विरोध नाही, पण पिकविणारा जगला पाहिजे. शेतकऱ्यांच्या हिताचा बळी जाऊ दिला जाणार नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com