sharad pawar and kale | Sarkarnama

चिखल तुडवत शेतात जाऊन त्यांनी शेतकऱ्यांना धीर दिला...

विक्रम काळे, आमदार मराठवाडा शिक्षक मतदारसंघ
बुधवार, 12 डिसेंबर 2018

औरंगाबाद : माझे वडील वसंतराव काळे यांचे निधन झाले आणि मी पोरका झालो. मला आजही आठवते त्याच दरम्यान केंद्रीय कृषीमंत्री असलेले शरद पवार साहेब औरंगाबाद सुभेदारी विश्रामगृहावर थांबलेले होते. त्यांना भेटण्यासाठी विविध राजकीय पक्षांचे नेते, वरिष्ठ अधिकारी, राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने आले होते, त्यात मी ही होतो. दुपारी पवार साहेब जेवायला बसले, त्यांनी सोबतच्या पदाधिकाऱ्यांना विचारले "वसंतचा मुलगा कुठे गेला, त्याला जेवायला बोलवा' माझ्यासाठी हा मोठा अविस्मरणीय क्षण होता. हजारोंच्या गर्दीतही माझ्या सारख्या सामान्य कार्यकर्त्याची त्यांनी आवर्जून आठवण काढली.

औरंगाबाद : माझे वडील वसंतराव काळे यांचे निधन झाले आणि मी पोरका झालो. मला आजही आठवते त्याच दरम्यान केंद्रीय कृषीमंत्री असलेले शरद पवार साहेब औरंगाबाद सुभेदारी विश्रामगृहावर थांबलेले होते. त्यांना भेटण्यासाठी विविध राजकीय पक्षांचे नेते, वरिष्ठ अधिकारी, राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने आले होते, त्यात मी ही होतो. दुपारी पवार साहेब जेवायला बसले, त्यांनी सोबतच्या पदाधिकाऱ्यांना विचारले "वसंतचा मुलगा कुठे गेला, त्याला जेवायला बोलवा' माझ्यासाठी हा मोठा अविस्मरणीय क्षण होता. हजारोंच्या गर्दीतही माझ्या सारख्या सामान्य कार्यकर्त्याची त्यांनी आवर्जून आठवण काढली. वडिलांच्या निधनानंतर पोरका झालेलो मी, पवार साहेबांनी मला आधार दिला अशा शब्दांत मराठवाडा शिक्षक मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे आमदार विक्रम काळे यांनी शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त सरकारनामाशी बोलतांना आठवणींना उजाळा दिला. 

शरद पवारांच्या व्यक्तिमत्वाबद्दल भरभरून बोलतांना विक्रम काळे म्हणाले, काश्‍मीरच्या अभ्यास दौऱ्यावर असतांना काही महिन्यापुर्वी आमच्या गाड्यांवर दहशतवादी हल्ला झाला होता. टीव्हीवर पवार साहेबांनी ही बातमी बघितली. मी पण या दौऱ्यात आहे हे कळल्यावर त्यांनी तात्काळ मला फोन केला. " विक्रम कसा आहेस, तुला काही झाले तर नाही ना ? काही मदत हवी असेल तर सांग आणि काळजी घे' अशी विचारपूस आणि वडीलकींचा सल्ला दिला होता. शेतकरी आणि पवार साहेब याचे देखील अतुट नाते आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्‍नावर पवार साहेब नेहमीच गंभीर आणि सजग असतात. 2016-17 मधील प्रसंग मला आजही आठवतो. निवडणूक पूर्व तयारीचा भाग म्हणून पवार साहेब मराठवाड्याच्या दौऱ्यावर होते. या भागात दुष्काळही होता, पण अचानक दोन दिवस अतिवृष्टी झाली आणि मराठवाड्यातील अनेक फळबागा, पिकांचे अतोनात नुकसान झाले. उस्मानाबादहून पवार साहेब बीडला जाणार होते, तिथे त्यांची सभा ठेवण्यात आली होती. अतिवृष्टी आणि त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाल्याचे कळताच त्यांनी सगळे कार्यक्रम रद्द केले आणि शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी करण्याचा निर्णय घेतला. 

उस्मानाबाद जिल्ह्यातील वडगाव येथील एक द्राक्षबाग शेतकऱ्यांच्या शेतात जायचे होते. पावसामुळे सर्वत्र प्रचंड चिखल झाला होता. कुठलेही वाहन शेतात जाऊ शकणार नाही अशी परिस्थिती होती. तेव्हा पवार साहेबांनी बैलगाडीतून शेतात जाण्याचा निर्णय घेतला. चिखल तुडवत त्यांनी शेताची पाहणी केली आणि शेतकऱ्याच्या पाठीवर हात ठेवत त्याला धीर दिला. मराठवाड्यातील ज्या शिक्षकांचे मी प्रतिनिधत्व करतो त्यांचे प्रश्‍न घेऊन जेव्हाही मी पवार साहेबांकडे गेलो त्यांनी मला वेळ आणि मोलाचे मार्गदर्शन केले. रात्री कितीही उशीर झाला, तरी सकाळी सात वाजता साहेब तयार असतात. त्यांच्यातील हा उत्साह आणि जनतेप्रती असलेली तळमळच आमच्या सारख्या कार्यकर्त्यांना उर्जा देत असते. अशा आमच्या साहेबांना निरोगी दीर्घायुष्य लाभो हीच त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देतो. 

(शब्दांकनः जगदीश पानसरे) 
 

 
 

संबंधित लेख