कर्जमाफी हा कायम उपाय नाही, उत्पादनखर्चावर पन्नास टक्के भाववाढ द्या - शरद पवार

खासदार पवार पुढे बोलताना म्हणाले की, शेतकरी कर्ज डोक्‍यावर ठेवून मरण पत्करण्यास तयार नसतो. त्याला कर्ज परत करायचे असते. या देशात लाखो कोट्यवधी रुपये बुडवणारे महाठग झालेत. शेतकरी इमानदार असल्याने त्याला कर्जमाफी देणे गैर नाही, असे माझे मत आहे. शेतकऱ्यांना बनावट व नकली कीटकनाशके विकणाऱ्या व त्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या कंपन्यांवर खटले दाखल करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटल्याचे मी वर्तमानपत्रातून वाचले. मात्र अशा औषधांची विक्री होणार नाही याची दक्षता सरकारने घ्यायला पाहिजे, असा सल्लाही त्यांनी दिला.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष पद्मविभूषण खासदार शरदचंद्र पवार यांचा सत्कार करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष पद्मविभूषण खासदार शरदचंद्र पवार यांचा सत्कार करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.

अमरावती : कर्जमाफी हा शेतकऱ्यांच्या अडचणी सोडविण्याचा कायमस्वरूपी मार्ग नाही. त्यासाठी शेतीच्या उत्पादनखर्चावर पन्नास टक्के भाववाढ केल्यास आर्थिक हातभार लावून तो सक्षम होऊ शकेल व हाच शेतकरी पुन्हा कर्जमाफी मागणार नाही. विद्यमान सरकारने शेतकऱ्यांची ही अपेक्षा पूर्ण करावी, असे प्रतिपादन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष पद्मविभूषण व माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी केले. 

अमरावती येथे खासदार शरद पवार यांचा सर्वपक्षीय नागरी सत्कार आयोजिण्यात आला असता, त्या वेळी ते सत्काराला उत्तर देताना बोलत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. पालकमंत्री प्रवीण पोटे, राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील, खासदार आनंद अडसूळ, महापौर संजय नरवणे, जिल्हा परिषद अध्यक्ष नितीन गोंडाणे, माजी मंत्री अनिल देशमुख, श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख, अरुण गुजराथी, कमलताई गवई, माजी आमदार सुलभा खोडके, जिल्ह्यातील आमदार, नगरसेवक, सर्व पक्षांचे जिल्हाध्यक्ष तथा शहराध्यक्ष प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण प्रकृती अस्वस्थतेमुळे कार्यक्रमास येऊ शकले नाहीत. 

शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर बोलताना त्यांनी आपल्याला शेती का आवडते, हे स्पष्ट करत शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवायच्या असतील तर त्याला अर्थिक सक्षम करावे लागेल. कर्जमाफी दिल्याने अडचणी कायमस्वरूपी सुटत नाहीत. मी कृषिमंत्री असताना कर्जमाफी दिली, तो उपाय नव्हता; मात्र त्या वेळी अडचणीतील शेतकऱ्याला मदत करण्याचा भाव होता. मुख्यमंत्री फडणवीस कर्जमाफी योजना जाहीर करण्यापूर्वी दिल्लीला मला भेटले व सल्ला मागितला, त्याही वेळी मी त्यांना कर्जमाफी द्या, असे सांगतानाच कायम उपाय करायचा सल्ला दिला. तो उत्पादनखर्चावर पन्नास टक्के भाववाढीचा होता. शेतकऱ्यांना चांगली बियाणे व शेतमालाला भाव दिल्यास त्याची उत्पादनक्षमता वाढण्यास मदत होईल. या सरकारला माझा सल्ला आहे, एकरी उत्पादन वाढवायचे असेल तर या मार्गाने गेले पाहिजे. उत्पादन वाढत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांचे प्रश्‍न सुटणार नाहीत, असे पवार म्हणाले. 

खासदार पवार पुढे बोलताना म्हणाले की, शेतकरी कर्ज डोक्‍यावर ठेवून मरण पत्करण्यास तयार नसतो. त्याला कर्ज परत करायचे असते. या देशात लाखो कोट्यवधी रुपये बुडवणारे महाठग झालेत. शेतकरी इमानदार असल्याने त्याला कर्जमाफी देणे गैर नाही, असे माझे मत आहे. शेतकऱ्यांना बनावट व नकली कीटकनाशके विकणाऱ्या व त्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या कंपन्यांवर खटले दाखल करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटल्याचे मी वर्तमानपत्रातून वाचले. मात्र अशा औषधांची विक्री होणार नाही याची दक्षता सरकारने घ्यायला पाहिजे, असा सल्लाही त्यांनी दिला. 

पवारसाहेब दिलदार विरोधक - मुख्यमंत्री 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पवारांचा उल्लेख दिलदार विरोधक असा केला. ते म्हणाले, राज्याच्या व देशहितासाठी पवारसाहेब पक्षीय राजकारण बाजूला ठेवत मदत करतात. कर्जमाफीचा मुद्दा आला असताना मी व चंद्रकांत पाटील त्यांना दिल्लीला जाऊन भेटलो. त्यांच्याशी सल्लामसलत केली. त्या वेळी पवारांनी राजकीय फायद्याचा विचार न करता अडचणीतील शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी कर्जमाफी देण्याचा सल्ला दिला. या कामात आवश्‍यक व हवे तितके सहकार्य करण्याचा शब्दही त्यांनी दिला. समृद्धी महामार्गाच्या मुद्द्यावर पवारसाहेब शेतकऱ्यांसोबत आंदोलनात उतरले; मात्र आंदोलन करताना त्यांनी महामार्गाला विरोध केलेला नाही. राज्याच्या विकासासाठी महामार्गाची आवश्‍यकता शेतकऱ्यांना समजावून सांगत त्यांनी आम्हाला मदतच केली. 

सहकारातील माझे गुरू पवार- अडसूळ 
सहकाराच्या क्षेत्रातील माझे राजकीय गुरू शरद पवार असल्याचे शिवसेनेचे खासदार आनंदराव अडसूळ यांनी सांगितले. सहकाराची चळवळ समृद्ध करण्यासाठी पवार यांचे योगदान मोठे असल्याचे सांगून अडसूळ म्हणाले, राज्यात सहकार चळवळीला चालना देण्यासाठी पवारांनी वेळोवेळी मदत केली. एवढेच नव्हे तर पवारांनी कधीही राजकीय चष्म्यातून कुणाला मदत केली नाही. महाराष्ट्राच्या विकासासाठी कुणीही पवार साहेबांना भेटला व त्याला मदत झाली नाही, असे कधीही झाले नाही. महाराष्ट्राच्या विकासाची कळकळ असणारा हा नेता महाराष्ट्राचे भूषण असल्याचे अडसूळ यांनी सांगितले. एकदा महाराष्ट्राच्या खेळाडूंना परदेशात जाण्यासाठी व्हीसा मिळत नव्हता. त्यावेळी पवार यांची तब्येत चांगली नव्हती. त्या स्थितीतही त्यांनी संबंधित मंत्रालयातील अधिकाऱ्यांना सांगून या खेळाडूंना व्हिसा मिळवून दिल्याची आठवण खासदार अडसूळ यांनी सांगितली. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com