sharad pawar about kvk | Sarkarnama

"केव्हीके' केंद्राकडेच ठेवण्यासाठी पवार मोदींशी बोलणार

ज्ञानेश्वर रायते
शनिवार, 19 ऑगस्ट 2017

पंतप्रधानांनी शेतीचे उत्पन्न दुप्पट करण्याचा संकल्प केला आहे. हा संकल्प सिद्धीस न्यायचा असेल; तर तर तो संशोधन संस्था, शास्त्रज्ञ, शेतकऱ्यांना प्रोत्साहन द्यावे लागेल. दुर्दैवाने धोरणात मात्र बदल दिसतो. संशोधनाचा निधी कमी केला तर शास्त्रज्ञ नाऊमेद होतील. त्यांची उमेद टिकवली पाहिजे. शास्त्रज्ञांना उमेद दिली, तरच संशोधन वेगाने पुढे जाईल. त्याचबरोबर नवे तंत्रज्ञान, नव्या वाणांचा वापर व शेतकऱ्यांचा संसार व्यवस्थित चालेल.

- शरद पवार 

बारामती : "शेतीचे तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोचविणारी कृषी विज्ञान केंद्रे (KVK)राज्यांकडे हस्तांतरित करण्याचा चाललेला केंद्रातील धोरणकर्त्यांचा विचार चुकीचा आहे,'' असे मत शरद पवार यांनी व्यक्त केले. 

जागतिक मधमाशी दिनानिमित्त ऍग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या कृषी विज्ञान केंद्र, क्रॉप लाइफ इंडिया व भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या वतीने आयोजित कार्यक्रमात पवार बोलत होते. या वेळी दिल्लीच्या भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे सहायक महासंचालक (पीक संरक्षण) डॉ. पी. के. चक्रवर्ती, राष्ट्रीय अजैविक ताण व्यवस्थापन संस्थेचे संचालक डॉ. एन. पी. सिंग, "अटारी' पुणेचे संचालक डॉ. लखन सिंग, राजगुरूनगरच्या कांदा व लसूण संशोधन संचालनालयाचे संचालक डॉ. मेजर
सिंग, क्रॉप लाइफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी ब्रीज ओबेरॉय, ऍग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे प्रमुख राजेंद्र पवार, राज्य डाळिंब बागायतदार संघाचे अध्यक्ष शहाजी जाचक, कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. सय्यद शाकीरअली आदी उपस्थित होते. 

ते म्हणाले, ""शेतशिवारापर्यंत तंत्रज्ञानाचा प्रसार करण्याच्या हेतूने "केव्हीके' स्थापन झाल्या. मात्र त्यांचे पूर्वी दर दोन वर्षांनी होणारे संमेलनही आता बंद केले आहे. "केव्हीके'ची जबाबदारी राज्यांकडे सोपवायची व त्यासंदर्भात निर्णयही राज्यांनी घ्यायचा, असे धोरण आखले जात आहे. वास्तविक पाहता "केव्हीके' या केंद्राच्याच अखत्यारीत ठेवल्या पाहिजेत, जिथे आर्थिक धोरणे व विकासाचे सूत्र ठरते, तिथूनच अशा विस्तार व संशोधनाच्या संस्थांना शक्ती मिळाली पाहिजे. आम्ही काही खासदार
केंद्र सरकारला हे सांगणार आहोत. मी पुढील आठवड्यात पंतप्रधानांना भेटणार आहे. बहुतेक याला विरोध होणार नाही.'' 

 

संबंधित लेख