sharad pawar | Sarkarnama

पवारांचे टायमिंग... "पुस्तकांच्या गावा'तील कमळ कोमेजले ! 

उमेश बांबरे 
शनिवार, 6 मे 2017

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्यानिमित्त भिलारमधील रस्त्यांच्या दुतर्फा कमळाचे झेंडे लावण्यात आले होते. त्यामुळे वातावरण भाजपमय झाले होते. पण दुसऱ्याच दिवशी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भिलार सदिच्छा भेट दिली आणि कमळाचे झेंडे गायब होऊन त्या जागी राष्ट्रवादीचे घडाळ्याचे झेंडे आले !

सातारा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्यानिमित्त भिलारमधील रस्त्यांच्या दुतर्फा कमळाचे झेंडे लावण्यात आले होते. त्यामुळे वातावरण भाजपमय झाले होते. पण दुसऱ्याच दिवशी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भिलार सदिच्छा भेट दिली आणि कमळाचे झेंडे गायब होऊन त्या जागी राष्ट्रवादीचे घडाळ्याचे झेंडे आले ! झेंड्यातील हा बदल पर्यटकांना अचंबित करून गेला. 

भिलार ता. महाबळेश्‍वर येथे मोठ्या दिमाखात गुरुवारी (ता. 4 मे) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे, आदींच्या उपस्थितीत पुस्तकाचे गाव उपक्रमाचे लोकार्पण झाले. या सोहळ्यासाठी संपूर्ण भिलार गावात स्वागत कमानी लावून ठिकठिकाणी रांगोळ्या घातल्या होत्या. याबरोबरच भारतीय जनता पक्षाचे झेंडे गावाच्या वेशीपासून ते शेवटच्या टोकापर्यंत रस्त्याच्या दुतर्फा लावण्यात आले होते. यामुळे संपूर्ण गावात भारतीय जनता पार्टीचे प्रतिबिंब उमटले होते. मंत्री तावडे यांनी आपल्या भाषणात मंत्र्यांच्या परदेश दौऱ्यावर होणाऱ्या टीकेला सडेतोड उत्तर दिले होते. तसेच भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्षांना व्यासपीठावर स्थान दिले होते. यामुळे राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या सातारा जिल्ह्यातील पक्षाचे नेते पुरते घायाळ झाले होते. 

दरम्यान, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे पर्यटनासाठी दोन दिवसांपूर्वी मुक्कामी आले होते. शुक्रवारी त्यांनी भिलारला भेट दिली. तत्पूर्वी पवार भिलारला येणार आहेत, अशी वार्ता परिसरात पसरली. गावागावातून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या गाड्या घाट चढू लागल्या. दुपारी चार वाजता गावात पवारांचे आगमन झाले. मुसळधार पावसात बाळासाहेब भिलारे, मकरंद पाटील यांनी पवारांसमवेत पुस्तकांच्या गावाची सैर केली. घरांना भेटी दिल्या. पुस्तके चाळली व कै. यशवंतराव चव्हाण यांचे स्मरण झाल्याची प्रतिक्रियाही नोंदवली. पवार येणार म्हणून कमळाने फुललेले भिलारच्या वेशीतील झेंड्यांचे घड्याळात रूपांतर झाले. रस्त्याच्या दुतर्फा डोलणारे हे झेंडे पाहून गुरुवारी आलेल्या पर्यटकांना हा बदल अचंबित करून गेला. तर भिलारसह महाबळेश्‍वरातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचे चेहरे नेत्यांच्या भेटीने फुलले होते. 

संबंधित लेख