देशाला जगवणारा बळीराजा जगला पाहिजे- शरद पवार

देशाला जगवणारा बळीराजा जगला पाहिजे- शरद पवार

औरंगाबाद ः खासगी सावकाराचे, बॅंकेचे कर्ज आणि काबाड कष्ट करून देखील निसर्गाच्या बेभरवशीपणामुळे शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला जातो, तेव्हा तो आत्महत्येकडे वळतो. कारण तो प्रामाणिक व स्वाभिमानी आहे. घेतलेले कर्ज फेडू न शकल्याचे शल्य त्याला सहन होत नाही. त्यामुळे त्याच्या मालाला योग्य भाव देऊन त्याला उभं करण्याची गरज आहे. देशाला जगवणारा बळीराजा जगावा यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करावा असे आवाहन माजी केंद्रीय कृषिमंत्री व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी औरंगाबादेत केले. 

शेतकऱ्यांना आम्ही 70 हजार कोटींची कर्जमाफी दिली, तेव्हा आमच्यावर हे बॅंक व्यवस्थाच मोडीत काढायला निघाल्याची टीका केली गेली. पण आज देशातील 20 मोठ्या राष्ट्रीयकृत बॅंकांचा एनपीए हा 2 लाख 80 हजार कोटींवर पोहचला आहे, त्याबद्दल मात्र कुणी काही बोलायला तयार नाही. शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊन दिलासा देण्याची मागणी केली की, त्याला कर्ज फेडण्याची सवय लागली पाहिजे असे म्हटले जाते. मुळात शेतकरी प्रामाणिक व स्वाभिमानीच आहे. तो बॅंकेचे कर्ज व्याजासहित फेडतो. पण निसर्गाने साथ दिली नाही तर मग त्याच्या समोर आत्महत्ये शिवाय पर्याय उरत नाही. ऑस्ट्रेलिया, अमेरिकेच्या कॅलिफोर्नियात देखील मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात पण त्या मागची कारणे वेगळी आहेत. 2004 मध्ये केंद्रात कृषिमंत्री असताना विदर्भातील वर्धा येथे शेतकऱ्याने आत्महत्या केल्याचे कळाले त्या रात्री मी झोपू शकलो नाही. दुसऱ्या दिवशी जाऊन त्या शेतकऱ्याच्या कुटुंबांची भेट घेऊन आत्महत्येमागची कारणे जाणून घेण्याचा प्रयत्न केल्याचे शरद पवार यांनी यावेळी सांगितले. 
शेतकऱ्यांना भाव दिला तर माझ्यावर टीका झाली 
शेतकऱ्यांच्या शेतीमालाला योग्य भाव मिळावा म्हणून खरेदी दरात वाढ केली तर देशभरातून माझ्यावर टीका झाली. पण त्याचा परिणाम असा झाला की शेतकऱ्यांनी भरघोस उत्पादन घेऊन अन्नधान्याच्या बाबतीत देशाला स्वावलंबी बनवले. देशाची गरज भागवून आपण अन्नधान्याची निर्यात करु शकलो. आज चित्र वेगळं आहे, निसर्गाचा लहरीपणा, कर्ज काढून घेतलेलं पीक येईलच याची शाश्‍वती राहिली नाही. पीक आल तर त्याला योग्य भाव मिळेलच हे खात्रीने सांगता येत नाही. आठवडाभरापूर्वी 15-16 रुपयांनी विकली गेलेली केळी गारपीटीनंतर 2-3 रुपयांना विकावी लागली. अशावेळी शेतकऱ्याने काय करावे ? शेतकऱ्याला जगवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न झाले पाहिजे अशी अपेक्षा शरद पवार यांनी व्यक्त केली. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com