भाजप-शिवसेना पुन्हा हिंदुत्वाचा शंख फुंकतील ? 

अमित शहा आणि उद्धव ठाकरे यांच्यात काय चर्चा झाली याचे रहस्य आहेच. मात्र हिंदुत्वाच्या मुद्यावर या दोघांचे एकमत होऊ शकते आणि या मुद्यावर काही झाले तरी ते एकत्र येऊ शकतात. राजकारणात रुसवेफुगवे असतात. ते कायम राहत नाहीत. शिवसेना भाजपची साथ कदापी सोडणार नाही.
भाजप-शिवसेना पुन्हा हिंदुत्वाचा शंख फुंकतील ? 

शिवसेना काल 52 वर्षाची झाली. गेल्या पाच दशकात शिवसेनेने बरेच चढउतार पाहिले. अद्यापही संघर्ष सुरूच आहे. शिवसेनेचे वर्धापनदिनानिमित्त पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे भाषण आजवरच्या भाषणापेक्षा वेगळे आणि अधिक आक्रमक होते असे वाटते. 

मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी स्थापन झालेले शिवसेनेचे बोधचिन्ह डरकाळ्या फोडणारा वाघ होता. तो आजही आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे आराध्य दैवत भवानी माता. वाघ हे भवानी मातेचे वाहन होते. म्हणून डरकाळ्या फोडणारा वाघ. ज्याच्या डरकाळीने अंगाचा थरकाप उडतो तशी डरकाळी बाळासाहेब आयुष्यभर राजकारणात फोडत आले.

तशी डरकाळी फोडत उद्धव यांनी भाजपसह राष्ट्रवादीवर हल्लाबोल केला. शिवसेनेची पुढील राजकारणाचा दिशा ही हिंदुत्वाची असेल हे त्यांच्या भाषणावरून लक्षात येते. भले कोणी काही म्हणो शिवसेना भाजप 2019 मध्ये पुन्हा एकदा हिंदुत्वाचा शंख फुंकतील असे दिसते. 

शिवसेना आज कोणत्या वळणावर आहे हे लक्षात घेण्याची गरज आहे. कधी कधी असे वाटते की बदलत्या राजकारणाकडे एक दृष्टिक्षेप टाकला तर शिवसेनेत जे फायरब्रॅंड नेते होते ते जर आज पक्षात असते तर शिवसेना सत्तेवर आली असती का ? इतकी ताकद आणि नेटवर्क या पक्षाकडे आहे.

बाळासाहेबांनंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना सांभाळली. बलाढ्य अशा भाजप, कॉंग्रेसला ती टक्कर देत आहे. प्रादेशिक पक्ष असला तरी शिवसेनेने देशभरातील इतर पक्षांचे लक्ष स्वत:कडे वेधून घेतले आहे. 

जो भाजप परममित्र होता तो शिवसेनेचा एकनंबरचा शत्रू बनला. नरेंद्र मोदींना विरोध करणाऱ्यांच्या पंगतीत शिवसेनेचा समावेश झाला आहे. शिवसेना ही केवळ मराठी माणसांसाठी लढणारी राहिली असती आणि ती हिंदुत्ववादी नसती तर कदाचित देशपातळीवर या पक्षाला अधिक महत्त्व प्राप्त झाले असते. मात्र तिचे जहाल हिंदुत्व धर्मनिरपेक्ष पक्षांना खुपते पण, शिवसेनेचा मोदी विरोध त्यांना भावतो. 

गेल्या चार वर्षात भाजपशी पटत नसतानाही ती सत्तेत आहे. 2019 मध्ये लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी शिवसेना कोणता निर्णय घेते याकडे अर्थात देशाचे लक्ष आहे. मुख्यमंत्री केजरीवाल यांनी नरेंद्र मोदींविरोधात सुरू केलेल्या लढाईला इतर प्रादेशिक पक्षांनी पाठिंबा दिला तसा शिवसेनेनेही दिला आहे. त्यामुळे राष्ट्रीय पातळीवर भाजपला खिंडीत गाठण्याचा प्रयत्न ती करताना दिसत असली तरी शिवसेनेचा भरवसा नाही. 

देशात भाजप सोडला तर शिवसेनेचा समविचारी पक्ष एकही नाही. भाजपविरोधात ती कितीही डरकाळ्या फोडत असली तरी या डरकाळीची भीती भाजपवाल्यांना वाटत नाही. उद्या मोदी-शहांनी जर वाघाला गोंजरले तर तो डरकाळी फोडणार नाही असेही बोलले जाते. महाराष्ट्रात तरी शिवसेनेला भाजपशिवाय आणि भाजपला शिवसेनेशिवाय दुसरा कोणता पर्यायच उरला नाही. मानअपमानाच्या काही घटना विसरून शिवसेना भाजप पुढेही एकत्र येतील. आज ते कितीही स्वबळाची भाषा करीत असले तरी ! 

शिवसेनेला इतर धर्मनिरपेक्ष पक्ष पाठिंबा देतील का ? हा प्रश्‍न उतरतोच. कॉंग्रेस तर कधीच आपल्या तत्त्वापासून दूर जाणार नाही हे राहुल गांधींनी अनेकदा स्पष्ट केले आहे. त्यामुळे शिवसेनेचे राष्ट्रीय राजकारण हे राज्यात दबावासाठी असणार यात शंका घेण्याचे काहीच कारण नाही. 

धुमसणाऱ्या काश्‍मीरवर उद्धव यांनी मुंबईत संताप व्यक्त केला तर तिकडे भाजपने "पीडीपी'चा पाठिंबा काढून घेतला. या दोन्ही घटनांचा अर्थही लक्षात घ्यावा लागेल. एकीकडे हिंदूंवर देशभर कसे आक्रमक होत आहे याची त्यांनी चिंता व्यक्त केली. तर दुसरीकडे राज्यातील राष्ट्रवादीवरही पगडीपुराण काढून हल्ला चढविला. संभाजी भिडेंना बाजीप्रभूंची उपमा देऊन भिडेंचे आक्रमक हिंदुत्व आम्हाला मान्य असल्याचे शिवसेनेने स्पष्ट केले आहे. 

तृणमूल कॉंग्रेस, सगळे जेडीयू-जेडीएस, मायावती, अखिलेश असेल किंवा टीडीपी असेल या सर्व पक्षांचा पायाच धर्मनिरपेक्ष आहे. एकवेळ भाजपचे मवाळ धोरण या पक्षाने चालू शकते हे दिसून आले आहे. मात्र शिवसेनेचे आक्रमक धोरण या पक्षांना कदापी भावणार नाही. महाराष्ट्रातील बिहार, उत्तरप्रदेश आणि गुजराती मतदार शिवसेनेपासून कधी नव्हे इतका दूर गेला आहे. त्यामुळे पुन्हा भाजपच्या गळ्यात गळा घालण्याशिवाय शिवसेनेपुढे दुसरा पर्यायच नाही. 

परप्रांतीयांची ही व्होट बॅंक सध्या तरी भाजपच्या ताब्यात आहे हे नाकारून चालणार नाही. शिवसेनेपासून दूर गेलेल्या मतदारांना चुचकारण्यासाठी तिला हिंदुत्वाचे कार्ड हे काढावेच लागेल. त्यामुळे हे दोन्ही पक्ष भविष्यात एकत्र आलेले दिसतील असे वाटते.

शिवसेनेतील मवाळ नेते हे भाजपबरोबर युती असावी यासाठी आग्रही असतात. हिंदुत्वाचा धागा पकडून हे दोन पक्ष एकत्र लढले तर कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीचा पराभव होऊ शकतो असे त्यांना नेहमीच वाटत आले आहे. मात्र 2014 मध्ये हिंदुत्वाऐवजी मोदी लाट आली आणि या लाटेवर स्वार होत भाजपने युती तोडली. हा भाग वेगळा असला तरी हिंदुत्व या एकमेव मुद्यावर युती पंचवीस वर्षे टिकली आहे. 

आगामी निवडणुकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विरोधकांची हवा काढून घेण्यासाठी कोणती जादूची कांडी बाहेर काढतील हे ही सांगता येत नाही.

गेल्या चार वर्षात काश्‍मीर जळत असताना भाजपने आताच का पाठिंबा काढून घेतला हे ही महत्त्वाचे आहे. त्यामुळेच शिवसेना-भाजपचे हिंदुत्वाचे कार्ड बाहेर आले तर आश्‍चर्य वाटू नये. "इस देशमे रहना होगा तो वंदेमातरम कहना होगा' चा बुलंद आवाज पुन्हा एकदा घुमू शकतो. या आवाजात शिवसेनेची डरकाळीही असू शकते.  


सरकारनामा अॅप - राजकीय बित्तंबातमी आपल्या मोबाईलवर - क्लिक करा आणि डाऊनलोड करा  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com