Shankarrao Gadakh Criticeses MLA Murkute | Sarkarnama

शहापूरकरांनो केवळ तुम्हालाच नाही तर भाच्यानं तालुक्यालाच मामा बनवलं; शंकरराव गडाखांची  आ. मुरकुटेंवर टीका

सुनील गर्जे
रविवार, 9 डिसेंबर 2018

"गेल्या विधानसभा निवडणुकीत गावचा भाचा म्हणून तन, मन, धनाने योगदान दिलेल्या शहापूरकडे मुरकुटे यांनी दुर्लक्ष करुन नवीन नातेवाईकांच्या उत्कर्षासाठी योगदान दिले. आता निवडणूक समोर दिसू लागल्यावर त्यांना तुमची आठवण होऊन 'मला सांभाळून घ्या' म्हणून तुमच्या भावनेला हात घालण्यास सुरुवात होईल. शहापूरकरांनो तुमच्या भाच्याने तुम्हालाच नाही तर संपूर्ण नेवासे तालुक्याला 'मामा' बनवले", अशी टीका आमदार बाळासाहेब मुरकूटे यांच्यावर माजी आमदार शंकरराव गडाख यांनी केली. 

नेवासे : "गेल्या विधानसभा निवडणुकीत गावचा भाचा म्हणून तन, मन, धनाने योगदान दिलेल्या शहापूरकडे मुरकुटे यांनी दुर्लक्ष करुन नवीन नातेवाईकांच्या उत्कर्षासाठी योगदान दिले. आता निवडणूक समोर दिसू लागल्यावर त्यांना तुमची आठवण होऊन 'मला सांभाळून घ्या' म्हणून तुमच्या भावनेला हात घालण्यास सुरुवात होईल. शहापूरकरांनो तुमच्या भाच्याने तुम्हालाच नाही तर संपूर्ण नेवासे तालुक्याला 'मामा' बनवले", अशी टीका आमदार बाळासाहेब मुरकूटे यांच्यावर माजी आमदार शंकरराव गडाख यांनी केली. 

नेवासे तालुक्यातील शहापूर हे येथील ग्रामपंचायतीच्या विविध विकास कामांचा शुभारंभ गडाख यांच्या हस्ते झाला. त्याप्रसंगी ते बोलत होते. ज्येष्ठ नागरिक कोंडीराम कोलते अध्यक्षस्थानी होते. 'मुळा'चे अध्यक्ष नानासाहेब तुवर, उपाध्यक्ष भाऊसाहेब मोटे, बाजीराव मुंगसे, सभापती कल्पना पंडीत, उपसभापती राजनंदिनी मंडलिक उपस्थित होते. 

शंकरराव गडाख म्हणाले, "मुळा धरणाच्या 70 टक्के पाण्यावर तालुक्याचे सिंचन अवलंबून असून गेल्या चार वर्षांच्या कालावधीत तालुक्यात पाटपाण्याची किती आवर्तने झाली, याचा अभ्यास लोकप्रतिनिधींनी करावा. विकासकामांच्या निधीपेक्षा लोकप्रतिनिधींचे फ्लेक्स बोर्डावर मोठाले फोटो लावण्याची स्पर्धा तालुक्यात सुरु केली आहे. लोकांच्या जीवनमरणाच्या प्रश्नांना बगल देऊन गडाखांना शिव्याशाप देण्याचा एककलमी कार्यक्रम तालुक्यात सध्या सुरु आहे.  मुळा धरणातून जायकवाडीत पाणी सोडण्याची गरजच नव्हती. मात्र आपल्या लोकप्रतिनिधींनी विरोध न केल्यामुळेच हा आत्मघाती निर्णय झाला आहे,"

तालुक्यातील दहा ते बारा हजार एकर ऊस हुमणीच्या प्रादुर्भावाने नष्ट होऊनही कापसाप्रमाणे ऊसाला अनुदान मिळवून देण्यासाठी लोकप्रतिनिधी प्रयत्न का करत नाहीत, असा सवाल करत राज्य शासनाची कर्जमाफी हा हातबट्ट्याचा व्यवहार ठरला असून दुष्काळ जाहीर होऊनही उपाययोजनांचा तपास नसल्याने कर्जमाफीनंतर तालुक्यातील शेतकऱ्यांनी घेतलेले 350 कोटी रुपयांचे फेडायचे कसे अशी भीती त्यांनी यावेळी व्यक्त केली.  

यावेळी अनिल अडसूरे, शहापूरचे सरपंच नारायण कोलते, प्रभाकर कोलते, ज्ञानदेव आरगडे, संजय वाल्हेकर, बाळासाहेब उंडे, माणिक कोलते, अशोक मंडलीक, राजेंद्र कोलते, बन्सीभाऊ एडके उपस्थित होते.

संबंधित लेख