shankararav gadakh | Sarkarnama

शंकरराव गडाखांच्या विरोधकांमध्ये फाटाफूट

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 18 मे 2017

नगर : नेवासे नगर पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्ताने माजी आमदार शंकरराव गडाख यांचे पानिपत करण्यास निघालेल्या विरोधकांची मोट बांधली न गेल्याने गडाखांचे पानिपत करण्याचा डाव फसला. सर्व पक्षांनी स्वतंत्र उमेदवार उभे करून महाआघाडी हेतू संपुष्टात आली. आता गडाख विरुद्ध आमदार बाळासाहेब मुरकुटे अशी लढत होत आहे. 

नगर : नेवासे नगर पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्ताने माजी आमदार शंकरराव गडाख यांचे पानिपत करण्यास निघालेल्या विरोधकांची मोट बांधली न गेल्याने गडाखांचे पानिपत करण्याचा डाव फसला. सर्व पक्षांनी स्वतंत्र उमेदवार उभे करून महाआघाडी हेतू संपुष्टात आली. आता गडाख विरुद्ध आमदार बाळासाहेब मुरकुटे अशी लढत होत आहे. 

राज्यातील नगर पंचायतच्या निवडणुका सुरू असताना नेवासे नगर पंचायतीचा विषय न्यायप्रविष्ट असल्याने दीड वर्षांनी उशिरा ही निवडणूक लढविली जात आहे. दरम्यानच्या काळात झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांत शंकरराव गडाख व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुले यांचे पटले नाही. त्यामुळे गडाख यांनी स्वतंत्र क्रांतिकारी शेतकरी पक्षाच्या माध्यमातून उमेदवार दिले होते. घुले व गडाख यांच्यातील राजकीय वाद सर्वश्रुत आहे. 

नेवासे नगर पंचायतीची निवडणूक 24 तारखेस होणार आहे. मतमोजणी 26 तारखेस होईल. 17 जागांसाठी होत असलेल्या या निवडणुकीसाठी क्रांतिकारी शेतकरी पक्षाने सर्व 17 जागांवर उमेदवार दिले आहेत. भारतीय जनता पक्षाने सोळा जागांवर, राष्ट्रवादीने तीन, शिवसेना नऊ तर कॉंग्रेसने केवळ एक उमेदवार दिला. कॉंग्रेस व भाजपमध्ये युती आहे. 

विरोधकांची महाआघाडी फिसकटली 
गडाख विरोधी इतर सर्व अशी स्थिती प्रारंभी झाली होती. मात्र ही युती फिसकटली. त्यामुळेच सर्व पक्षांनी वेगवेगळे उमेदवार दिले. मतदानानंतर गडाख यांना बहुमत न मिळाल्यास विरोधक सत्तेसाठी पुन्हा एकत्र येऊ शकतात. त्यामुळे गडाख यांच्यापुढे मोठे आव्हान आहे. भाजपचे नेते आमदार बाळासाहेब मुरकुटे तसा प्रयत्न करू शकतात. 
प्रशांत, शंकरराव गडाखांची जोरदार तयारी 
ज्येष्ठ नेते व माजी खासदार यशवंतराव गडाख हे राजकारणात विशेष लक्ष घालत नसले, तरी त्यांचे पुत्र शंकरराव गडाख व प्रशांत गडाख यांनी जोरदार तयारी केली आहे.

शंकरराव गडाख यांच्या ताब्यात मुळा सहकारी साखर कारखान्यांसारखे सत्ताकेंद्र आहे. प्रशांत गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली मुळा एज्युकेशन सोसायटी सुरू आहे. शिवाय नगर पंचायतीत ते सत्ताधारी असल्याने त्यांचा संपर्कही मोठा आहे. त्यांनी तयारीही जोरदार केली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते पांडुरंग अभंग, जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुले, आमदार बाळासाहेब मुरकुटे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विठ्ठल लंघे यांचा विरोधात गडाख कुटुंबीय कशी लढत देते, हे आता काळ ठरवेल. 

संबंधित लेख