shankar suger factory election | Sarkarnama

रणजितसिंह मोहिते- पाटील विरूद्ध पद्मजादेवी मोहिते- पाटील!

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 17 नोव्हेंबर 2018

कारखान्याच्या निवडणूक आखाड्यात मोहिते-पाटील विरूद्ध मोहिते-पाटील असा सामना रंगणार

माळशिरस (सोलापूर): सदाशिवनगर (ता. माळशिरस) येथील श्री शंकर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी निवडणूक रिंगणात 43 उमेदवार शिल्लक राहिले आहेत. 

कारखान्याच्या निवडणूक आखाड्यात मोहिते-पाटील विरूद्ध मोहिते-पाटील असा सामना रंगणार असून त्यामध्ये माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांचे सुपूत्र माजी खासदार रणजितसिंह मोहिते- पाटील विरूद्ध माजी राज्यमंत्री कै. प्रतापसिंह मोहिते-पाटील यांच्या पत्नी पद्मजादेवी मोहिते- पाटील या चुलती - पुतण्यात संस्था प्रतिनिधीमध्ये गटात थेट लढत होत आहे. 

भानुदास सालगुडे पाटील यांच्या गटाने डॉ. धवलसिंह मोहिते पाटील गटाशी समझोता केल्यामुळे आता ही निवडणूक दुरंगी होणार असल्यामुळे या निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. महिला राखीव मतदार संघ व संस्था प्रतिनिधी गट अशा दोन ठिकाणाहून पद्मजादेवी निवडणूक लढवित आहेत. तर, बोरगाव उत्पादक गट क्रमांक पाचमधून डॉ. धवलसिंह मोहिते पाटील व धनश्री मोहिते-पाटील महिला राखीव मतदार संघातून निवडणूक रिंगणात आहेत. माळशिरस उत्पादक गट क्रमांक 1 मध्ये जनार्दन शिंदे व संभाजी सालगुडे यांनी माघार घेतल्यामुळे प्रत्येक गटाचे तीन उमेदवार एकमेकांविरुद्ध उभे आहेत. 

इस्लामपूर उत्पादक गट क्रमांक 2 मध्ये लक्ष्मण पवार यांनी अर्ज काढून घेतल्यामुळे याही गटात प्रत्येक गटाचे तीन उमेदवार आपले नशीब अजमावत आहेत. नातेपुते उत्पादक गट क्रमांक 3 मधून कोणीही अर्ज माघारी न घेतल्यामुळे प्रत्येक गटाचे तीन उमेदवार एकमेकांविरुद्ध उभे आहेत. फोंडशिरस उत्पादक गट क्रमांक चारमधून आद्रट व पंकज वाघमोडे यांनी माघार घेतल्यामुळे दोन्ही गटाचे सहा उमेदवार रिंगणात आहेत. 

बोरगाव उत्पादक गट क्रमांक पाचमधून 9 उमेदवारांपैकी सचिन तोडकर, बबन साळुंखे, व नामदेव रोकडे यांनी आपले अर्ज माघारी घेतले आहेत. या गटातून डॉ. धवलसिंह मोहिते पाटील उभे आहेत. संस्था प्रतिनिधी मतदार संघातून राजेंद्र पाटील या रिंगणातून बाहेर पडले आहेत. या गटात रणजितसिंह मोहिते पाटील विरूद्ध पद्मजादेवी मोहिते पाटील असा सामना रंगतदार सामना होणार आहे. 

अनुसूचित जाती किंवा जमाती प्रतिनिधी मतदार संघातून मधुकर सरवदे यांनी माघार घेतल्यामुळे या मतदार संघात तिरंगी सामना होणार आहे. महिला राखीव प्रतिनिधी मतदार संघातून अलका पाटील, लिलावती देवकर या दोन महिलांनी माघार घेतल्यामुळे दोन गटाच्या चार महिला उभ्या आहेत. यामध्ये पद्मजादेवी मोहिते पाटील, धनश्री मोहिते- पाटील व देवयानी सालगुडे पाटील या मातब्बर महिला उभ्या आहेत.

इतर मागासवर्गीय जातीचा प्रतिनिधी या मतदार संघातून गोपाळ गोरे व रामदास कर्णे यांनी माघार घेतल्यामुळे या मतदार संघात शिवाजी गोरे व जनार्दन शिंदे यांच्यात दुरंगी सामना होणार आहे. भटक्‍या विमुक्त जाती व जमाती विशेष मागास प्रवर्गाचा प्रतिनिधी या मतदार संघात सुनील माने व लक्ष्मण मारकड यांच्यात दुरंगी सामना होणार आहे. 25 नोव्हेंबर रोजी मतदान तर 27 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.  

संबंधित लेख