shalini vikhe patil | Sarkarnama

शालिनी विखे मंत्र्यांना "जाब' विचारणार! 

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 20 जुलै 2017

शालेय पोषण आहारात कीड लागलेली मटकी, दुर्गंधीयुक्त तेल आल्याच्या तक्रारी असल्याने यासंबंधीचे पुरावे घेऊन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शालिनी विखे पाटील शिक्षणमंत्री विनोद तावडे, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांची मुंबई येथे भेट घेऊन जाब विचारणार आहेत. 

नगर : शालेय पोषण आहारात कीड लागलेली मटकी, दुर्गंधीयुक्त तेल आल्याच्या तक्रारी असल्याने यासंबंधीचे पुरावे घेऊन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शालिनी विखे पाटील शिक्षणमंत्री विनोद तावडे, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांची मुंबई येथे भेट घेऊन जाब विचारणार आहेत. 

अजनूज (ता. श्रीगोंदे) येथील शाळांमध्ये निकृष्ट दर्जाचा पोषण आहार देत असल्याच्या तक्रारी जिल्हा परिषद सदस्य सदाशिव पाचपुते यांनी केल्या होत्या. त्यांनी कीड लागलेली मटकी, दुर्गंधीयुक्त तेल आदी वस्तू थेट विखे पाटील यांच्या टेबलावर मांडल्या. त्यामुळे संबंधितांवर कडक कारवाई करण्याचा इशारा विखे पाटील यांनी दिला होता. आता त्या मंत्र्यांची भेट घेत आहेत. 

दरम्यान, जिल्हा परिषद अधिकारी, पदाधिकाऱ्यांना दाखविल्याशिवाय पोषण आहार शाळांना देऊ नये, असा ठराव स्थायी समितीत झाला होता. मात्र, त्यावर कार्यवाही झाली नसल्याने विखे पाटील यांनी अधिकाऱ्यांना फैलावर घेतले. जिल्ह्यात एकाच ठेकेदारामार्फत पोषण आहाराचा पुरवठा होतो. शिक्षणाधिकाऱ्यांमार्फत सर्व गटशिक्षणाधिकाऱ्यांना पोषण आहाराची शहानिशा करण्यास आणि त्याचा अहवाल तातडीने जिल्हा परिषदेला सादर करण्यास सांगितले आहे. पोषण आहार निकृष्ट असल्यास तो तातडीने बंद करून नमुने जिल्हा परिषदेला पाठवावेत, अशी सूचना विखे पाटील यांनी केली. 

गेल्यावर्षी पंकजा मुंडे यांच्या विभागाकडील चिक्‍की खरेदीचा विषय गाजला होता. पंकजांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते. या प्रकरणाची चौकशीही झाली. एकूणच पोषण आहाराच्या मुद्यावर पंकजा बॅकफूटवर आहेत. त्यामुळे नगर जिल्ह्यातील तक्रारीविषयी थेट जाब विचारण्याची भाषा होत आहे. 

 

संबंधित लेख