shahu suger factory issue | Sarkarnama

आमदार मुश्रीफ टॅंकरभर प्रदुषित पाणी आणणार!

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 13 नोव्हेंबर 2018

या सर्व प्रकारावर घाटगे यांनी मात्र मौन बाळगले आहे.

कोल्हापूर : चार दिवस घोरपडे कारखान्याच्या प्रदुषणाचा विषय जिल्ह्यात गाजत आहे. प्रदुषणाच्या नावाखाली राजकारण सुरु असल्याचा आरोप कारखान्याचे संस्थापक आमदार हसन मुश्रीफ यांनी केला आहे.

तसेच गेली 40 वर्षे शाहू साखर कारखान्याकडून प्रदूषण होत आहे. मात्र आम्ही त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचे सांगत म्हाडाचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांच्याकडे अप्रत्यक्षरित्या मोर्चा वळवला आहे. तसेच घोरपडे कारखान्यातील प्रदुषित पाण्याची बाटली देवून तक्रार करणाऱ्यांना आम्ही दुषित पाण्याचा टॅंकर देवू, असा इशाराही प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आला. 

चार दिवसापूर्वी कारखाना कार्यक्षेत्रातील गावामध्ये घोरपडे कारखान्याच्या प्रदुषणावरुन दोन गटात वादावादी झाली. यावेळी आमदार मुश्रीफ यांच्या दिशेने पाण्याच्या घागरी फेकण्यात आल्या. दोन्ही बाजुंनी चांगलाच राडा झाला. राजकीय हेतूने प्रेरित होवून कारखान्यावर आरोप होत असल्याचे पत्रक प्रसिध्दी देतानाच माझ्यावर घागरी फेकणारा अजून जन्माला यायचा आहे, असे सांगत विरोधकांचा समाचारही घेतला. दरम्यान शिवसेना शिष्टमंडळाने सोमवारी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांची भेट घेत कारखाना बंद करण्याची मागणी केली. त्याला काही वेळातच आमदार मुश्रीफ यांनी समक्ष येवून आक्षेप घेतला. 

कारखाना बंद करण्यावरुन आमदार मुश्रीफ व प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांची वादावादी झाली. यावेळी जिल्हा बॅंकेचे संचालक भैय्या माने यांच्यासह कार्यकर्त्यांनी मंडळाच्या अधिकाऱ्यांना शाहू कारखान्याकडून होणाऱ्या प्रदुषणाची माहिती दिली. अशीच कारवाई होणार असेल तर, दिवसाकाठी 10 साखर कारखाने बंद करावे लागतील, असा इशारा आमदार मुश्रीफ यांनी दिला. यावेळी अधिकाऱ्यांनी घोरपडे कारखान्यातून नमुन्यासाठी बाटलीभर आणलेले पाणी दाखवले. त्यामुळे मुश्रीफ समर्थक चांगलेच संतापले. जर तुम्ही बाटलीभर पाणी घेवून प्रदूषण दाखवत असाल तर आम्ही तुम्हाला टॅंकरभर प्रदुषित पाणी आणून देतो, कारवाई करा, अशी मागणी केली. या सर्व तक्रारीचा रोख शाहू कारखाना व समरजितसिंह घाटगे असाच होता. आमदार मुश्रीफ यांनी वारंवार शाहू कारखान्याच्या प्रदुषणाचा प्रश्‍न अधोरेखित करत घाटगे यांच्याकडे अंगुलीनिर्देश केला. मात्र या सर्व प्रकारावर घाटगे यांनी मात्र मौन बाळगले आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख